अण्णांचा पंतप्रधानांना टोला - Marathi News 24taas.com

अण्णांचा पंतप्रधानांना टोला

झी 24 तास वेब टीम, दिल्ली
 
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचे आव्हान देणा-या काँग्रेस पक्षाला तसेच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना टीम अण्णाने चांगलाच चिमटा काढला आहे. अण्णांना आव्हान देण्याआधी काँग्रेसने पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लोकसभेची निवडणूक लढायला लावून जिंकून दाखवावे, असा टोला सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी हाणला आहे.
 
अण्णा हजारे यांच्या टीमने केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या चांदनी चौक मतदारसंघात जनलोकपाल विधेयकाबाबत नागरिकांची मते आजमावली. तेव्हा ८५ टक्के मतदारांनी अण्णांच्या जनलोकपाल विधेयकाच्या मसुद्याला पाठिंबा दिला होता. त्यावर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या चांदनी चौक मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी दिले होते.

 
काँग्रेसच्या या आव्हानावर माहिती अधिकार कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी जोरदार टोला लगावला. अण्णा हजारे तर संत माणूस आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ना त्यांच्याकडे धनशक्ति आहे, ना बाहुबळ आहे. काँग्रेस ही पैसेवाल्यांची पार्टी आहे. असेच होते तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लोकसभेची निवडणूक लढवण्याऐवजी राज्यसभेच्या माध्यमातून मागच्या दाराने संसदेत का पाठवले ? काँग्रेसला जर आपल्या जनाधारावर एवढा विश्वास आहे तर अण्णांना आव्हान देण्याआधी त्यांनी पंतप्रधानांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरवले पाहिजे, असा टोमणा केजरीवाल यांनी मारला.
 

First Published: Sunday, October 2, 2011, 12:05


comments powered by Disqus