राज यांच्या वक्तव्याची चौकशी होणार- गृहमंत्री - Marathi News 24taas.com

राज यांच्या वक्तव्याची चौकशी होणार- गृहमंत्री

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
ऐन दिवाळीत संजय निरूपम यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि वादाला तोंड फुटलं, शिवसेना, मनसे यांनी दिवाळी संपेपर्यंत वाट पाहण्याचे ठरवलं मात्र दिवाळी संपताच राज यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळ्याच वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला. आणि त्यानंतर मात्र सरकार सावध झाले.  गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी प्रत्येक वक्तव्याची चौकशी केली जाईल असे स्पष्ट केले.
 
राज ठाकरे, अबू आझमी आणि संजय निरुपम यांच्या वक्तव्याची चौकशी होणार आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही माहिती दिली आहे. या वक्तव्यांची चौकशी करुन दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश आर. आर. पाटील यांनी दिले आहेत. राज्याच्या गृहविभागामार्फत ही चौकशी होणार आहे. सध्या परप्रांतीय आणि मराठी या वादावरुन संघर्ष पेटलेला आहे. परप्रांतीय नेतेही त्यांच्या वक्तव्यानं या वादामध्ये तेल ओतत आहे. याच पार्श्वभूमीवर परप्रांतीयांच्या नेत्यांनी असली वक्तव्य बंद केली नाही तर मुंबईत दंगली होतील, असा इशारा राज ठाकरे यांनी कालच दिला. या सगळ्या पार्श्वभूमीवर या नेत्यांच्या वक्तव्यांची चौकशी होणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

First Published: Friday, November 4, 2011, 14:08


comments powered by Disqus