Last Updated: Monday, February 20, 2012, 09:06
www.24taas.com, मुंबई 
मुंबईत अंधेरीमध्ये लोकांची अक्षरशः झोप उडाली आहे. त्याला कारण आहे एक मंकी मॅन. या मंकी मॅनच्या दहशतीनं लोक चांगलेच हैराण झाले आहेत. पोलीस मात्र या सर्व प्रकाराकडं दुर्लक्ष करत आहेत. अंधेरीतल्या मरोळ परिसारातले लोक सध्या मंकी मॅनच्या दहशतीनं बेजार झाले आहेत. एक मंकी मॅन रात्री अपरात्री आणि अगदी दिवसासुद्धा घरात शिरतो, असं इथले लोक सांगतात.
एका आठवड्यापासून या परिसरात असंच भीतीचं वातावरण आहे. हातात काठ्या घेऊन नागरिक अक्षरशः रात्ररात्र जागून पहारा देत आहेत. मंकी मॅनची ही दहशत चांगलीच पसरली आहे. रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी म्हणजेच अगदी झाडांवरही लाईट लावण्यात आले आहेत. रात्रभर एकाही घरासमोरचे दिवे बंद केले जात नाही. दहशत पसरवलेल्या या मंकी मॅनच्या शोधासाठी पूर्ण परिसरात रात्र जागून काढली जाते आहे.
स्थानिक पोलीस मात्र याकडे फारसं गांभीर्यानं पाहताना दिसत नसल्याने नागरिक भीतीने जास्तच बेजार झाले आहेत. ही एक अफवा असल्याचं पोलीस सांगतात. मात्र, लोक या एकूणच प्रकरणानं भयभीत झाल्याचं चित्र दिसतं आहे.
First Published: Monday, February 20, 2012, 09:06