Last Updated: Friday, March 2, 2012, 09:08
www.24taas.com,मुंबई मंकी मॅन आणि चड्डी बनियान टोळीच्या अफवांनी मुंबईकर पुरते दहशतीखाली आहेत आणि त्यातूनच चोर सोडून भलत्याच लोकांना मारहाणीचे प्रकारही वाढले आहेत. असे असताना नक्की काय! मंकी मॅन की चड्डी बनियान टोळी, याचीच चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्याना, मंकी मॅनच्या अफवा पसरवणारी टोळी असू शकते, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पुण्यात संशय व्यक्त केला आहे. पोलीस या टोळीचा छडा लावतील असं त्यांनी गुरुवारी सांगितलं.
ठाणे, मुलुंड भागात काही दिवसांपूर्वी मारहाणीच्या अशाच घटना घडल्या.दहशतीखाली असलेले नागरिक रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा देतात आणि रात्र-रात्र जागून काढत आहेत. अशाच वेळी कोणी अनोळखी व्यक्ती दिसली तर चोर समजून त्याला बेदम मारहाण केली जाते. मुलुंडमध्ये काही दिवसांपूर्वी अशाच काही व्यक्तिंना मारझोड करण्यात आली. चड्डीवर असलेल्या कामगाराला चड़्डी-बनियान टोळीचा सदस्य समजून नागरिकांनी बेदम मारलं, पण नंतर तो सामान्य कामगार असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे अनोळखी व्यक्ती एखाद्या परिसरात दिसली आणि त्या व्यक्तीचा संशय आला तर त्याला बेदम मारहाण करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे अनेकदा निष्पांपांना या अफवेतून रोषाचे बळी ठरावं लागत आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगणं गरजेचं बनलं आहे. तसंच संशयास्पद व्यक्ती दिसली तर तिला पकडून पोलिसांकडे देणं हाच योग्य पर्याय ठरू शकतो, असा सूर आता उमटू लागला आहे. मंकी मॅन आणि चड्डी बनियान टोळीच्या अफवांनंतर धास्तावलेले लोक मग मिळेल त्या अनोळखी व्यक्तीवर राग काढतत आहेत. ठाण्याच्या चरई भागात काही दिवसांपूर्वी एका कामगाराला असाच चोप देण्यात आला. त्यामुळे धास्तावलेले लोक नक्की काय! मंकी मॅन की चड्डी बनियान टोळी, असा सवाल करीत आहेत.
First Published: Friday, March 2, 2012, 09:08