Last Updated: Monday, March 19, 2012, 14:19
www.24taas.com, मुंबईराज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं तिसरा उमेदवारही रिंगणात उतरवलाय. प्रकाश बिनसाळे यांनी तिसरा उमेदवार म्हणून अर्ज भरलाय. याआधी राष्ट्रवादीनं पुण्याचा माजी महापौर वंदना चव्हाण आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डी पी त्रिपाठींना उमेदवारी दिलीय.
राज्यसभेच्या निवडणुकीत मनसेची मतं राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता वर्तविली जातेय. डी पी त्रिपाठी हे परप्रांतीय असल्यामुळं मनसेची मतं मिळवण्यात अडचण होऊ शकते या कारणामुळं बिनसाळेंचा अर्ज भरून राष्ट्रवादीनं सावध भूमिका घेतल्याचं बोललं जातंय.
खबरदारी म्हणून आम्ही तिसरा अर्ज भरला असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी प्रकाश बिनसाळे यांच्या अर्जावर बोलताना सांगितले.
राज्यसभेची शपथ मी मराठी घेणार असल्याचेही त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यापूर्वी राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डी पी त्रिपाठी यांना दुसऱ्या क्रमांकची उमेदवारी दिलीय. त्रिपाठी यांना तिकीट दिल्यामुळं विद्यमान खासदार गोविंदराव आदिक आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा पत्ता कट झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून त्रिपाठी हे पक्षात आहेत.
तसंच आजपर्यंत त्यांना कोणतही पद देण्यात आलं नव्हतं. त्यामुळं राज्यसभेसाठी त्यांचा विचार झाल्याचं बोललं जातंय. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणूनही त्रिपाठींनी काम पाहिलं होतं. त्रिपाठींच्या रुपानं काँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादीनंही महाराष्ट्राबाहेरचा उमेदवार दिलाय.
दरम्यान, महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणा-या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरत असल्यामुळं निवडणूकीत रंगत आलीय. काँग्रेसनं विलासराव देशमुख आणि राजीव शुक्ला यांना, राष्ट्रवादीनं वंदना चव्हाण आणि डी पी त्रिपाठींना, शिवसेनेनं अनिल देसाईंना, भाजपनं अजय संचेती यांना उमेदवारी दिलीय. तसंच अपक्ष संजय काकडे हेही रिंगणात उतरले आहेत.
First Published: Monday, March 19, 2012, 14:19