Last Updated: Monday, March 19, 2012, 19:42
www.24taas.com, मुंबई गेल्या आठवड्यात पर्यावरण खात्याने परवानगी नाकारल्याने अरबी समुद्रात शिवस्मारक होणार नाही, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याला खोडत शिवस्मारक अरबी समुद्रातच होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानपरिषदेत दिली. मुख्यमंत्र्यांनी याबाबतचं निवेदन आज विधानपरिषदेत दिलं.
शिवस्मारकासाठी एक वर्षाच्या आत केंद्राच्या पर्यावरण विभागाची परवानगी घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. येत्या पाच वर्षात हे शिवस्मारक होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवस्मारकाचा मुद्दा हा शिवसेनेनं अस्मितेचा प्रश्न बनवलाय.त्यामुळे सत्ताधाऱ्यांची तोंडं अशी दोन दिशेला असताना त्यांनी याचा फायदा घेत जोरदार तोफ डागली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित स्मारकाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून विधानसभेत चांगलाच गाजत आहे.
समुद्रकिनाऱ्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरु झाल्याचं सरकारनं स्पष्ट केल्यानंतर शिवसेनेनं सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत सभागृह दणाणून सोडलं होतं.
First Published: Monday, March 19, 2012, 19:42