पंतप्रधानांचा आघाडीवर वार, नाराज झाले पवार! - Marathi News 24taas.com

पंतप्रधानांचा आघाडीवर वार, नाराज झाले पवार!

www.24taas.com, मुंबई
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आघाडी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाराजी व्यक्त केली. काही निर्णय आघाडी सरकार असल्यामुळे आम्हांला घेता येत नाही, असे पंतप्रधानांनी वक्तव्य केले होते. ममता बॅनर्जी आणि करुणानिधी यांच्यानंतर आता पंतप्रधानांवर नाराजी व्यक्त केली आहे.
 
 
पुण्याचे बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांनी शरद पवार यांच्या सांगण्यावरून राज्यसभेची उमेदवारी मागे घेतली. त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. काकडे यांच्या माघारीनंतर पवारांनी वेगळाच आलाप घेतला. त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर हल्लाबोल केला.
 
केंद्रात आम्ही साधारण सात वर्षापासून एकत्र सत्तेत आहोत. कोणत्याही निर्णय प्रक्रियेत आम्ही अडथळा आणला नाही. परंतु, पंतप्रधानांनी सर्व घटक पक्षांबद्दल सरसकट बोलणे चुकीचे आहे. पंतप्रधानांचे वक्तव्य मला आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी वेदनादायक असल्याचेही पवार यांनी सांगितले.
आम्ही कायम आघाडीचा धर्म पाळला आहे. आम्ही सरकारची कधी अडवणूक केली नाही. त्यामुळे आमच्या पक्षाने कधी असे काम केले नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
तिसऱ्या आघाडीच शक्यता फेटाळली
बादल यांच्या शपथविधीला सुप्रिया सुळे गेल्या होत्या. त्यावरून तिसऱ्या आघाडीची शक्यता आहे का? तसे तुम्ही सरकारला संकेत दिले आहेत का? असे पत्रकारांनी विचारले असता, पवार म्हणाले बादल यांच्याशी माझे १९७८ पासूनचे संबंध आहेत. तसेच आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या शपथविधीला जाणे हा माझा वैयक्तिक प्रश्न होता. याच कोणीही संबंध लावू नये.
 
 
ममता बॅनर्जी या देखील नाराज
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी या देखील नाराज असल्याचे पवारांना विचारण्यात आले, त्यावर पवार म्हणाले, प्रत्येक पक्षाचे आपला विचार असतो. तसा ममता बॅनर्जींचा आहे. त्यामुळे त्या त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत.
 
 
मी भविष्यवेत्ता नाही
सध्या ज्या प्रकारचे वातावरण आहे, त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची शक्यता आहे का, या प्रश्नावर पवार म्हणाले, मी काही भविष्यवेत्ता नाही. त्यामुळे जेव्हा कधी निवडणुका होतील माझा पक्ष निवडणुकीला तयार आहे.

First Published: Tuesday, March 20, 2012, 19:49


comments powered by Disqus