Last Updated: Thursday, March 22, 2012, 18:47
www.24taas.com, मुंबईझेडपी अध्यक्षपदाच्या निवडणूकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत जुंपलीय. काँग्रेसनं आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये, आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिलाय.
विदर्भात 4 जिल्हा परिषदांत सत्तेसाठी राष्ट्रवादीनं शिवसेना-भाजपसोबत समझौता केल्यानं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केलीय. राष्ट्रवादीनं आघाडी धर्माचं पालन केली नसल्याची टीकाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय.
यावर उत्तर देताना काँग्रेसनंचं या प्रकाराची सुरुवात केल्याचं सांगत, कोल्हापुरात काँग्रेसनं राष्ट्रवादीला सोबत न घेता राजू शेट्टींशी हातमिळवणी करत सत्ता मिळवली. काँग्रेसनं पहिल्यांदा कोल्हापुरातून सुरुवात केल्याचा आरोप पिचड यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी घरातली चूक सुधारली असती, तर ही परिस्थिती आली नसती, असंही पिचड यांनी म्हटलय. अखेरच्या क्षणापर्यंत आम्ही काँग्रेसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न कला, मात्र काँग्रेसकडून कोणतंही उत्तर मिळालं नसल्याचं त्यांनी म्हटलय.
दरम्यान, काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीनं शिवसेना-भाजपशी हातमिळवणी केल्यानं काँग्रेस नेते संतप्त झालेत. झेडपीच्या सत्तेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या बेबनावाच्या परिस्थितीमुळे माणिकरावांनी सोनिया गांधींची भेट घेऊन तक्रार केलीय.
तसंच शिवसेना-भाजपसोबत जाऊन राष्ट्रवादीनं विचारांशी तडजोड केली आहे का असा सवालही माणिकारावांनी केलाय. यवतमाळ, अमरावती, गडचिरोलीत राष्ट्रवादीनं युतीच्या साथीनं सत्ता मिळवून काँग्रेसला दणका दिला, तर नागपूर आणि चंद्रपुरात थेट भाजपला साथ दिली. या संधीसाधू राजकारणामुळे काँग्रेस नेते भडकले आहेत.
First Published: Thursday, March 22, 2012, 18:47