दादांचे गॅस दरवाढीचे पाऊल मागे - Marathi News 24taas.com

दादांचे गॅस दरवाढीचे पाऊल मागे

www.24taas.com, मुंबई
 
 
स्वयंपाकाच्या गॅसवर केलेली पाच टक्के दरवाढ मागे घेण्यासाठी दबाव वाढल्यानं अर्थमंत्री अजित पवार तसा निर्णय घेण्याची शक्यता दुणावली आहे. दरम्यान विरोधक आणि सत्ताधा-यांच्या विरोधामुळे गॅसदरवाढ मागे घेण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. दरवाढीबाबत योग्य तो निर्णय घेऊ असे पवार यांनी 'झी २४ तास'शी बोलताना सांगिरले.
 
 
आधी विरोधी शिवसेना-भाजप-मनसे आणि नंतर काँग्रेसनंही गॅस दरवाढीला विरोध करून अजित पवारांची कोंडी केल्यानंतर आता राष्ट्रवादीनंही तसाच पवित्रा घेतलाय. अर्थात दरवाढ कमी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार करत असले तरी काँग्रेसला शह देण्यासाठी अजितदादांना हे पाऊल उचलावं लागल्याची चर्चा आहे.
 
 

दरवाढ मागे घेतली तर त्याचं श्रेय विरोधक आणि काँग्रेसलाच जाऊ नये म्हणून आता राष्ट्रवादीनंही दरवाढ मागे घेण्याची मागणी केल्यानं सर्वपक्षीय दबावापुढे अजितदादांना झुकावं लागण्याची चिन्हं आहेत.  त्यामुळे नाराजी कमी करण्याचा प्रयत्न  करू असं सांगत अर्थमंत्री अजित पवार यांनी 5 टक्के दरवाढ मागे घेण्याचे संकेत झी 24 तासशी बोलताना दिलेत. तर विरोधकांनीही आक्रमक पवित्रा घेत कामकाजाच्या सुरूवातीलाच विधान भवनाच्या पाय-यांवर बसून आंदोलन केलं. गॅस दरवाढ मागे घेण्याची मागणी यावेळी विकोधकांनी केली.
 
 
एकीकडे विरोधक आणि सत्ताधा-यांच्या विरोधामुळे गॅसदरवाढ मागे घेण्याचे संकेत अजित पवारांनी दिलेयत. तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि काँग्रेसच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन करवाढ मागे घेण्याची मागणी केली. एकंदरीतच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा सर्वच पक्षांनी गॅस दरवाढीला विरोध केल्यामुळे ही दरवाढ मागे घेतली जाण्याची शक्यता आहे.

First Published: Tuesday, March 27, 2012, 16:51


comments powered by Disqus