कापूस आंदोलनात भाजपाची उडी - Marathi News 24taas.com

कापूस आंदोलनात भाजपाची उडी

झी २४ तास वेब टीम, मुंबई

राज्यात कापूस दरवाढीचं आंदोलन पेटलेलं असतानाच आता त्याच्यावरुन राजकारणही सुरु झालंय. शिवसेनेपाठोपाठ भाजपानंही या आंदोलनात उतरण्याचा इशारा सरकारला दिलाय. कापसासाठी १९ तारखेपासून रस्त्यावर उतरणार असल्याचं सांगत भाजपानंही यात उडी घेतली.

ऐन निवडणुकांच्या तोंडावर कोंडीत सापडलेल्या काँग्रेसनं उद्धव ठाकरेंवर शेलकी टीका केलीय. राजू शेट्टी यांच्या ऊसदरवाढीच्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाच्या आंदोलनानं जोर धरलाय. कापसाला ६००० रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी मोठ्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर उतरलाय.


स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोडांवर मिळालेली ही संधी सोडण्यास विरोधकही सरसावले आहेत. या आंदोलनाचं नेतृत्व करण्याची संधी साधत २१ तारखेपासून राज्यात दिंडी आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी दिला. त्यापाठोपाठच कापसासाठी १९ तारखेपासून रस्त्यावर उतरणार असल्याचं सांगत भाजपानंही यात उडी घेतली.
 


ऊस आंदोलनानं तोंड पोळलेलं असताना, निवडणुकांच्या तोंडावर पेटलेल्या कापूस आंदोलनानं सरकारची धवापळ सुरु झालीय. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह शिष्टमंडळ लवकरच दिल्ली दरबारी पंतप्रधानांसमोर तोडग्यासाठी साकडं घालणार आहे. यातच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं काँग्रेस नेते चवताळलेत.
 


ऊसाच्या प्रश्नाचा फटका पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला बसू नये, यासाठी तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुढाकार घ्यावा लागला होता. तसा कापूस आंदोलनासाठी काँग्रेसला घ्यावा लागणार आहे. अन्यथा विदर्भ, मराठवाड्यात याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. तर यानिमित्तानं विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात सरकारविरोधी रण पेटवण्याचा शिवसेना-भाजपचा प्रयत्न आहे.

First Published: Thursday, November 17, 2011, 06:58


comments powered by Disqus