कसा होता शेअरबाजारातील आजचा दिवस - Marathi News 24taas.com

कसा होता शेअरबाजारातील आजचा दिवस

www.24taas.com, मुंबई
 
आज शेअर बाजार बंद होतानाचं सेन्सेक्स १७ हजार ४८६ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये १११ अंशांची घट पहायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज ५३२२ अंशावर बंद झाला. निफ्टीत ३५ अंशांची घट झाली. मागच्या तुलनेत बाजार आज सकाळी खालच्या पातळीवर खुला झाला. ताज्या आकडेवाडीनुसार, मार्च महिन्यात सेवा क्षेत्राच्या वाढीत घसरण झाल्यामुळे सकाळच्या सत्रात बाजारात मंदीचं वातावरण होतं.
 
युरोपीयन शेअर बाजार खालच्या पातळीवर खुलल्यामुळे दुपारच्या सत्रातही भारतीय बाजारात घटचं दिसून आली आणि ती अखेरपर्यंत कायम राहिली. वेगवेगळ्या वीज कंपन्यांशी २० वर्षांसाठी इंधनपुरवठा करार करण्यासाठी, कोल इंडियाला राष्टपतींनी निर्देश जारी केल्यानंतर कोल इंडियाच्या स्टॉक्समध्ये घट दिसून आली. याउलट आता कोल इंडियाला कराराची पूर्तता करावी लागणार असल्यानं टाटा पॉवर, रिलायन्स पॉवर, एनटीपीसी या वीज कंपन्याचे स्टॉक्समध्ये वाढ दिसून आली. हेवीवेट रिलायन्सच्या स्टॉक्समध्ये घट दिसून आली.
 
रिफाईनींगमधल्या नफ्यात घट आणि केजी-डी सिक्स गॅस ब्लॉकमधलं उत्पादन घटल्यामुळे रिलायन्सचे व्यवहार घटल्याचं सांगण्यात येतं आहे. व्याजदराबाबत संवेदनशील असणाऱ्या बॅंका आणि रियल इस्टेटचे स्टॉक्स गेल्या तीन दिवसांपासून तेजीत होते, मात्र आज त्यांच्यात घट पहायला मिळाली. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस ऑथोरीटीनं एलपीजी पाईपलाईन टॅरिफ कमी केल्याच्या वृत्तामुळे गेलच्या स्टॉक्समध्ये ३ % घट दिसून आली. आज भेल, हिंडाल्को, मारूती सुझुकी, ओएनजीसी आणि एनटीपीसी या कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत. तर जिंदाल स्टील, गेल, स्टर्लाईट इंडिया, भारती एअरटेल, ICICI बॅंक या कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत.
 
 
 

First Published: Wednesday, April 4, 2012, 16:22


comments powered by Disqus