Last Updated: Wednesday, April 4, 2012, 18:05
www.24taas.com, मुंबई इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीविरोधात १६ एप्रिलपासून राज्यभरातील रिक्षाचालक संपावर जातील,असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. भाडेवाढ करण्याची रिक्षा संघटनांची मागणी आहे. दरम्यान, मुंबई शहरातील जुन्या-नव्या रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्यासंदर्भात सुरू झालेल्या मोहिमेला मंगळवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
राज्यातील रिक्षांना ई-मीटर बसवण्यात सक्ती करण्यात आली आहे. तसेच सीएनजीवर सुरू झालेल्या रिक्षांचे भाडे कमी करण्यात यावे, असे स्पष्ट आदेश आरटीओ विभागाने दिले आहेत. मात्र, नवी मुंबईत यावरून वाद निर्माण झाला आहे. तर काहींनी इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने रिक्षाचालकांना केलेली सक्ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर ही मागणी मान्य न केल्यास १६ पासून राज्यातील रिक्षाचालक संपावर जातील, असे संघटनेने म्हटले आहे.
मुंबईतील अंधेरी आरटीओ येथे जुन्या आणि नव्या मिळून १८ रिक्षा 'फिटनेस सटिर्फिकेट'साठी आल्या. त्यापैकी तीन रिक्षांमधील ई-मीटरमध्ये तांत्रिक अडचण आल्याने ती बाद करण्यात केल्याचे सांगण्यात येत आहे. १५ रिक्षांमध्ये ई-मीटर बसवण्यात आले असून त्यात तीन जुन्या रिक्षा व १५ नव्या रिक्षांचा समावेश आहे. वडाळा आरटीओ येथे एकूण १२ नव्या रिक्षांमध्ये ई-मीटर लागले आहेत. रिक्षाचालकांचा अल्प प्रतिसादामुळे आरटीओ जोरदार मोहीम उघडण्याची शक्यता आहे. तर रिक्षा संघटनेची याचिका न्यायालयाने फेटाळल्याने पुन्हा संपाचा इशारा देण्याचे कारण काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
First Published: Wednesday, April 4, 2012, 18:05