'सामना'ने राजची उडवली रेवडी, वड्याची झाली रबडी' - Marathi News 24taas.com

'सामना'ने राजची उडवली रेवडी, वड्याची झाली रबडी'

www.24taas.com, मुंबई
 
बिहार दिनावरुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. खमंग वड्याची रबडी झाली या शब्दांत शिवसेनेचं मुखपत्र सामनातून बाळासाहेबांनी मनसे आणि राज ठाकरेंवर तोंडसुख घेतलंय.
 
महाराष्ट्र अस्मितेचा राजकीय लक्ष्मीबॉम्ब हा वातीला आग लागण्याआधीच विझल्याची टीका बाळासाहेबांनी केलीय. सुरुवातीला बिहारदिनाला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंनी तलवार उपसण्याआधीच म्यान केली या शब्दात शरसंधान साधलंय. त्यामुळं दोन दिवसांचा बिनपैशांचा तमाशा प्रसिद्धीसाठीच असतो आणि त्याचं मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा विकास याच्याशी देणेघेणे नसतं अशी खरमरीत टीकाही शिवसेनाप्रमुखांनी केलीय.
 
मुंबईत बिहार दिन साजरा केला जाईल. आम्हाला कोणीही अडवून शकत नाही, असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी केले होते. त्यानंतर मालेगावात तुम्ही मुंबईत बिहार दिन साजरा करून दाखवाच, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. मात्र, बिहार दिनाचे आयोजक देवेश ठाकूर यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर बिहाराचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्याशी फोनवरून बोलणे झाल्यानंतर राज यांनी बिहार दिनाला ‘ग्रीन सिग्नल’ दिला. बिहार दिन हा राजकीय कार्यक्रम नसल्याने तो सांस्कृतिक आहे. त्यामुळे आपली काही हरकत नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली.

First Published: Saturday, April 14, 2012, 18:27


comments powered by Disqus