छेड का काढली विचारले, त्यालाच जीवे मारले.. - Marathi News 24taas.com

छेड का काढली विचारले, त्यालाच जीवे मारले..

www.24taas.com, मुंबई
 
मैत्रिणीची छेड काढणाऱ्या गुंडांना हटकणाऱ्या युवकाला, आपले प्राण गमवावे लागल्याची घटना मुंबईत घडली आहे. मागच्या वर्षी अंधेरीतल्याच दोन युवकांची याच कारणावरून गुंडांनी हत्या केली होती. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
 
मुंबईच्या अंधेरी भागात राहणाऱ्या अंश अग्रवाल या १७ वर्षीय युवकाला, आपल्या मैत्रिणीची छेड काढणाऱ्यांचा विरोध करणं जीवावर बेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अंशच्या मैत्रिणीला मोबाईलवर अश्लील SMS येत होते. अंशने SMS पाठवणाऱ्यापैकी एकाला याबाबत विचारणा केली.
 
याचा राग येऊन या टोळक्यानं अंशच्या घरी धडक दिली. अंश घरी नसल्याचं पाहून गुंडांनी त्याच्या भावाचं अपहरण केलं. अंश जेव्हा भावाला सोडवायला गेला, तेव्हा गुंडांनी अंशला बेदम मारहाण करून त्याचं डोकं ठेचलं. या घटनेनंतर पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे.
 
यातले बरेचसे आरोपी हे अल्पवयीन आहेत. मागच्या वर्षी अंधेरीच्याच अंबोली भागात, मुलीची छेड काढण्याला विरोध करणाऱ्या दोन तरुणांचा खून करण्यात आला होता. अंशच्या हत्येनंतर पुन्हा त्याच थरारक घटनेची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीचं वाटणारं कुतुहल आणि त्यातून निर्माण होणारी हिंसक प्रवृत्ती दिवसेंदिवस चिंता वाढवणारी ठरते आहे.
 
 
 
 
 

First Published: Thursday, April 19, 2012, 07:34


comments powered by Disqus