Last Updated: Saturday, April 21, 2012, 12:07
www.24taas.com, मुंबई मुंबईतील गिरणी कामगारांसाठी 'म्हाडा'च्या वतीने मुंबईत बांधलेल्या घरांच्या किमतीत १० टक्क्यांची सवलत देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. त्यामुळे गिरणी कामगारांना आता साडेसात लाखांत घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
८ लाख ३४ हजारांची ही घरे आता प्रत्येकी साडेसात लाखांना मिळणार आहे. गिरणी कामगारांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला जमीन वाटप करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा झालेल्या २२ गिरणी कामगारांच्या वारसांना मोफत घरे देण्याची घोषणाही राज्य सरकारने केली. दरम्यान गिरणी कामगारांनी आंदोलन केल्याने सरकारला जाग आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

या फ्लॅटच्या किंमतीत सवलत देण्याबाबत तसेच म्हाडाला मिळालेल्या ८.९५ हेक्टर जमिनींचा विकासही फ्लॅट बांधण्यासाठी करावा अथवा कामगारांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना जमिनी द्याव्यात, अशी शिफारस संसदीय कार्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारला केली होती. त्यानुसार, बहुमजली इमारतींमधील सहा हजार ७७८ फ्लॅटची किंमत सुमारे ८४ हजार रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री यांनी विधानसभेत गिरणी कामगारांच्या प्रश्नांसदर्भातील चचेर्त स्पष्ट केले. या फ्लॅटची लॉटरी मे २०१२ अखेरीस काढण्यात येणार आहे.
एखाद्या गिरणीमधील कामगारांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेने जमिनी मिळवण्यासाठी अर्ज केला आणि त्या इच्छुकांची संख्या उपलब्ध घरांच्या तुलनेत कमी असल्यास संबंधित गिरण्यांमधील जमीन त्या सहकारी संस्थेस वितरीत करण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. काही घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.
First Published: Saturday, April 21, 2012, 12:07