Last Updated: Monday, April 30, 2012, 09:13
www.24taas.com, मुंबई मुंबईतील वांद्रे येथील भारतनगर वसाहतीतील ४५ जणांना रविवारी लग्नाचे जेवण बाधल्याने त्यांना पालिकेच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. या सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत वाडेकर यांनी सांगितले.
अब्दुल शेख यांच्या मुलाचे शनिवारी लग्न होते. लग्नामध्ये रात्री दहाच्या सुमारास जेवणावळी वाढल्या गेल्या. लग्नात जेवून घरी गेलेल्यांना मध्यरात्रीपासून त्रास होऊ लागला. पोटदुखी, उलट्या, जुलाब होत असल्याचे कारण सांगत पहाटे पाच वाजल्यापासून भाभा हॉस्पिटलमध्ये पेशंटची रांग लागली. परिसरातील ७० पेक्षा अधिक रहिवाशांना सकाळी सहा वाजल्यापासून पोटात मळमळणे आणि जुलाब असा त्रास सुरू झाला. हा प्रकार वांद्रे-कुर्ला पोलिसांना कळवण्यात आला. लग्नाच्या भोजनातून तब्बल ४५ जणांना विषबाधा झाल्याचे दुपारपर्यंत स्पष्ट झाले.
बाधितांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याने त्यांचे चिंताग्रस्त पालक भाभा रुग्णालयाबाहेर थांबले होते. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झालेल्या व्यक्तींना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. भाभा रुग्णालयात ३९ जणांवर उपचार सुरू होते; त्यामध्ये १८मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.या घटनेची गंभीर दखल घेऊन वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांनी युसूफ अली मोहम्मद खान या केटररविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी दिली
First Published: Monday, April 30, 2012, 09:13