शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल - Marathi News 24taas.com

शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल

www.24taas.com, मुंबई
 
सिंचनावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली असतानाच शरद पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. आघाडी सरकार चालवणं ही एक कला आहे.आम्ही 1978 साली आघाडी सरकार चालवलं, पण कुरघोडी केली नाही. तसंच केंद्रात आम्ही सात आठ वर्षं एकत्र आहोत, पण एकमेकांवर कुरघोड्या केल्या नाहीत. असं म्हणत पवारांनी मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट केलंय.
 
कुरघोड्या करुन आघाडी सरकार चालवता येत नाही, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय. मुंबईकडे राज्य सरकारचं लक्ष नाही, MMRDA निधी उभारण्यासाठी भूखंड विकतंय, पण त्याचा अतिरेक करु नका, असं म्हणत पवारांनी मुख्यमंत्र्यांवरच रोख ठेवत टीका केलीय. इतकंच नाही तर सगळ्यांना बरोबर घेऊन कसं चालायचं असतं, ते जरा त्यांना सांगा, असा निरोपही त्यांनी पतंगरावांमार्फत दिलाय.
 
सिंचनावरुन मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये ठिणगी पडलीय आता पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य केल्यानं दोन्ही काँग्रेसमधला वाद पेटता राहणार, अशीच चिन्हं आहेत.

First Published: Saturday, May 5, 2012, 19:09


comments powered by Disqus