पत्नी असावी, सीतेसारखी! - Marathi News 24taas.com

पत्नी असावी, सीतेसारखी!

www.24taas.com, मुंबई
 
 
आजच्या विवाहित  स्त्रियांनी रामायणातील सीतेचा आदर्श ठेवला पाहिजे. सर्व सुख मागे ठेवून पतीसोबत १४ वर्षे सीता वनवासाला गेली. प्रभू रामचंद्रांसोबत वनवास भोगला. हा सीतेचा आदर्श विवाहित स्त्रियांनी ठेवला पाहिजे, असे मत  मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केले.
 
 
सीता प्रभू रामासोबत ज्याप्रमाणे वनवासात राहण्यास तयार झाली, तसेच पत्नीने देखील पतीचे काम ज्या ठिकाणी असेल तेथे त्याच्यासोबत राहण्यास संमती दर्शवावी, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. शिपवर काम करीत असलेल्या कोलकाता येथील एका पतीने पत्नी आपल्या कामाच्या ठिकाणी राहण्यास येत नसल्याच्या मुद्दय़ावर घटस्फोट मिळावा, यासाठी अपील दाखल केले आहे. या खटल्याची सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे मत व्यक्त केले आहे.
 
 
मुंबईतील मुलीसोबत २00५ मध्ये लग्न झाल्यावर पती पाच वर्षे कामानिमित्त शिपवरच होता. त्या वेळी पत्नी मुंबईतच राहत होती. त्यानंतर पतीची बदली अंदमान येथे झाली. त्या वेळी पतीने पत्नीला आपल्यासोबत राहण्यास बोलावले; परंतु अंदमान येथे जाण्यास पत्नीने नकार दिल्याने या मुद्दय़ावर पतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. न्यायलायाने तो फेटाळला. त्याला पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी सुरू आहे. या दाम्पत्याल्या नऊ वर्षांची मुलगी आहे. यामुलीकडे पाहून तुम्ही पुन्हा एकत्र यावे आणि सुखाचा संसार करावा, असे मतही न्यायालयाने नोंदविले आहे. यापुढील सुनावणी २१ रोजी होणार  आहे.
 

First Published: Wednesday, May 9, 2012, 12:03


comments powered by Disqus