राज्यपालांकडे बोट, शरद पवार टीकेचे धनी - Marathi News 24taas.com

राज्यपालांकडे बोट, शरद पवार टीकेचे धनी

www.24taas.com, मुंबई
 
दुष्काळावरील  पॅकेजच्या पहिल्या टप्प्याचा निधी पुढील आठ दिवसांत देणार असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी दिली. फेब्रुवारीत राज्यानं केंद्राकडं मागणी केलेल्या मदतीची पूर्तता होणार आहे. मात्र काल मागणी केलेल्या पॅकेजबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा करूनच निर्णय होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शरद पवारांना सर्वत्र टीकेचा 'सामना' करावा लागत आहे.

अनुशेष धोरणातून घेतलेली भूमिका महाराष्ट्रातल्या कोरड्या सिंचनाला जबाबदार असल्याचं मत नोंदवत पवार यांनी राज्यपालांना पुन्हा टार्गेट केले. विदर्भ-मराठवाड्याचा विश्वास मिळवण्यासाठी तेव्हा जी पावलं टाकली त्यातून आता विघटन दिसू लागलंय, असा धोक्याचा इशारा देत अनुशेष धोरणाच्या फेरविचाराची मागणी पवारांनी पुन्हा केली.
 
फक्त बारामतीचाच विकास - उद्धव ठाकरे
दरम्यान,  शरद पवार महाराष्ट्राच्या नेत्यांवर बोलतात मात्र त्यांनी केवळ बारामतीचाच विकास केला,  अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सिंचनाची श्वेतपत्रिका निघायलाच पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी म्हंटलय. मुंबईतल्या नालेसफाईच्या कामांची उद्धव यांनी पाहणी केली.
 
 
सत्ता सोडा आणि रस्त्यावर या - शेतकरी संघटना
स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं  शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दुष्काळ निवारणासाठी राज्यपाल आडकाठी ठरत असतील तर तुम्ही सत्तेतून बाहेर पडून रस्त्यावर या, असं आवाहन शेतकरी संघटनेनं शरद पवारांना केलंय. दुष्काळी भागातील समस्य़ांच्या पार्श्वभूमीवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाशिव खोत यांनी साता-यात शरद पवारांची भेट घेऊन निवेदन दिलं. राज्यापालांचे आहे की, आघाडी सरकारचे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
 
राज्यपालांकडे बोट दाखविणे चुकीचे - खडसे
सिंचन धोरणाबाबत राज्यपालांक़डे बोट दाखवून शरद पवार जबाबदारी झटकत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. राज्यपालांवर असे आक्षेप घेणं चुकीचं असल्याचंही ख़डसे यांनी म्हटले आहे.
 


 
 

First Published: Thursday, May 10, 2012, 09:22


comments powered by Disqus