ठाणे दुर्घटना : ४२ तासांनी संपलं ढिगारा उपसण्याचं काम, thane building collapse, 72 dead

ठाणे दुर्घटना : ४२ तासांनी संपलं ढिगारा उपसण्याचं काम

ठाणे दुर्घटना : ४२ तासांनी संपलं ढिगारा उपसण्याचं काम
www.24taas.com, ठाणे

शिळफाटा रोडवरच्या कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा उपसण्याचं काम तब्बल ४२ तासांनंतर म्हणजे आज दुपारी संपलं. तोवर मृतांची संख्या ७२ पर्यंत पोहचलीय तर ६२ जण जखमी झालेत.

मृतांमध्ये २६ लहान मुलं, २६ पुरूष आणि २० महिलांचा समावेश आहे. १५ मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पालिका आयुक्त आर.ए. राजीव यांचं निलंबन करावं, अशी मागणी जमात-ए-उलेमा-ए-हिंद या संघटनेनं केली आहे. संघटनेनं शुक्रवारी मुंब्रा बंदची हाक दिली आहे.

ठाण्यात ९० टक्के इमारती अनधिकृत
दरम्यान, मुंब्र्यात ९० टक्के इमारती अनधिकृत आहेत अशी कबुली ठाण्याचे महापालिका आयुक्त आर.ए. राजीव यांनी दिलीय. यातील अनेक इमारती सीआरझेड अंतर्गत येतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणं शक्य होत नाही. तसेच अनधिकृत इमारती पाडण्यासाठी पालिकेकडे पुरेसं मनुष्यबळ नसल्याचंही कारण त्यांनी दिलंय.

अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
ठाणे बिल्डिंग दुर्घटनेप्रकरणी ठाण्याचे उपायुक्त दीपक चव्हाण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नाईक यांना निलंबित करण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ही घोषणा केली. विरोधकांनी सरकारला आत्ता जाग आली? का अशी विचारणा केली तसंच ठाण्याचे आयुक्त आर.ए.राजीव यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली.

‘त्या’ इमारतीत सुरू होते लहानग्यांचे क्लास
ठाण्यातल्या त्या अनधिकृत इमारतीमध्ये कोचिंग क्लासेस सुरु होते अशी माहिती उघड झालीय. या दुर्घटनेत आतापर्यंत २६ चिमुकल्यांचा मृत्यू झालाय. मात्र, हा आकाडा आणखी वाढण्याची भीती सामाजिक कार्यकर्त्या शबनम शेख यांनी ‘झी २४ तास’शी बोलताना व्यक्त केलीय.
बिल्डर अजूनही फरारच
ठाणे बिल्डिंग दुर्घटनेला जबाबादार असणारे दोन फरार बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जमाल कुरेशी आणि सलीम शेख अशी त्यांची नावं आहेत. या दोघांचेही फोटो ‘झी २४ तास’च्या हाती लागलेत. अनधिकृत इमारत उभारणारे हे यमदूत ७२ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहेत. या दोघांच्या घरांना आणि ऑफिसला पोलिसांनी सील ठोकलंय. जमील कुरेशी हा बसपाचा कार्यकर्ता आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो बांधकाम व्यवसायात आहे. तीन महिन्यांत बिल्डिंग उभी करण्याचा पराक्रम याच दोघा बेजबाबदार बिल्डर्सनी केलाय. आता या दुर्घटनेनंतर दोघेही फरार झालेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार असा सवाल विचारला जातोय.

First Published: Saturday, April 6, 2013, 14:43


comments powered by Disqus