राज्यात जिल्हा ठिकाणी सुरु होणार विमानसेवा, The airline will start in the district

राज्यात जिल्हा ठिकाणी सुरु होणार विमानसेवा

राज्यात जिल्हा ठिकाणी सुरु होणार विमानसेवा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये सर्वाधिक प्रवास हा विमानाने केला जातो. कारण त्याठिकाणी डोंगराळ प्रदेश आहे. तसाच काहीसा प्रयोग हा आता महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. राज्यातील जिल्हा मुख्यालये लवकरच विमानसेवेने जोडली जाणार आहेत. याबाबत चाचपणी सुरू आहे.

अनेक जिल्ह्यात विमानतळ उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी विमानसेवा सुरू आहे. तर काही जिल्ह्याच्या ठिकाणी विमानतळ असूनही त्याचा वापर करण्यात आलेला नाही. एखादा राजकीय कार्यक्रम किंवा उद्योगपतींचा दौरा असेल तर अशा विमानतळाचा वापर होतो. किंवा एखाद्या ठिकाणी तात्पुरते हेलिपॅड तयार करण्यात येते. मात्र, राज्य सरकारने जिल्ह्याच्या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यातबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली.

जिल्हा ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यासाठी `सुप्रीम एव्हीएशन इंडिया` या कंपनीने या बाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. ही सेवा यशस्वी होण्यासाठी राज्य सरकारनेही काही भार उचवावा, अशी अपेक्षा या कंपनीने केली आहे. या कंपनीकडे ११ आसनी विमाने असून कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, नाशिक, अमरावती, गोंदिया, लातूर, औरंगाबाद अशा शहरांमघ्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे. मात्र ही सेवा आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर ठरावी यासाठी पहिले दीड वर्ष ११ पैकी पाच आसनांची जबाबदारी शासनाने घ्यावी, असा प्रस्ताव कंपनीने दिला आहे.

जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याबाबत मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या विमानतळ विकास प्राधिकरणाच्या बैठकीत सुप्रीम एव्हीएशनने हा प्रस्ताव दिला. त्यावर जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या विमानसेवेची सवलत देण्याचा विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच कंपनीने दिलेला भाडे प्रस्ताव अधिक असल्याने विमानाचे वेळापत्रक, भाडे याबाबतचा तपशील द्यावा अशी सूचना कंपनीस करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात अत्याधुनिक २२ विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे बोलताना सांगितले. शासनाला उद्योगात गुंतवणूक करता येत नाही. त्यासाठी खासगी गुंतवणूकदार, उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सोयी-सुविधा देण्याची गरज आहे. उद्योगधंद्यांना चालना मिळावी म्हणून राज्यात प्रगत २२ विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 8, 2014, 16:41


comments powered by Disqus