ढासळलेल्या सोन्यावर कर्ज घ्यायचंय, तर..., thinking about to take gold loan

ढासळलेल्या सोन्यावर कर्ज घ्यायचंय, तर...

ढासळलेल्या सोन्यावर कर्ज घ्यायचंय, तर...
www.24taas.com, मुंबई

सोन्याच्या किंमती गेल्या आठवडाभरात ढासळताना दिसल्या यामुळे ज्यांनी सोनं गहाण ठेऊन कर्ज घ्यायचा बेत आखला असेल ते मात्र धास्तावलेत. भाव पडल्यानं कर्जधारकांना पहिल्यापेक्षा जास्त सोनं गहाण ठेवावं लागणार आहे. सोन्याचे भाव आणखी कोसळले तर ज्या कंपन्या आणि ज्वेलर्स सोनं गहाण ठेऊन कर्जवाटप करताना दिसतायत त्यांच्या चिंतेत मात्र वाढ होईल.

सोन्याकडे आत्तापर्यंत एका पिढिनं गुंतवणूक म्हणून पाहिलंय. ज्याच्या किंमतीचा आलेख सदा चढताच राहिलाय. कठिण काळात सोन्याचा आधार सामान्यांना वाटत होता. पण, गेल्या सहा दिवसांमध्ये सोन्याच्या भावात झालेला उतार पाहिला तर या समजाला नक्कीच धक्का बसलेला जाणवेल.

आर्थिक गुंतवणूकदारांच्या सल्ला लक्षात घेतला तर सोन्याच्या उतरत्या किंमतीनंतर ग्राहकांनी गोल्ड लोन कंपन्यांना आणि ज्लेलर्सना दूर ठेवलेलंच बरं... त्यापेक्षा लोनसाठी सरळ बँकेचा मार्ग स्वीकारा. कारण गोल्ड लोन कंपन्यांसाठी लोन टू व्हॅल्यू रेशो ६० टक्के आहे. तर बँका सोन्याच्या किंमतीपैकी ७०-९० टक्क्यांपर्यंत रक्कम कर्जस्वरुपात देतात.

गोल्ड लोन कंपन्या केवळ ज्वेलरीच्या बदल्यातच कर्ज देतात तर बँकेकडून गोल्ड कॉइन आणि गोल्ड बारच्या मोबदल्यातही कर्ज देतात. जिथं बँका १२ ते १५ टक्क्यांपर्यंत गोल्ड लोन ऑफर करतात तिथंच गोल्ड लोन कंपन्या १५ ते २६ टक्क्यांपर्यंत व्याज घेतात. गरज पडलीच तर बँका सोन्याऐवजी ओव्हरड्राफ्टची सुविधाही देतात. क्रेडिट हिस्ट्रीही बँकांकडून लोन घेतल्याचा एक महत्त्वपूर्ण फायदा होतो. त्यामुळेच सोन्याच्या पडत्या काळात गोल्ड लोन घेणाऱ्यांनी बँकेचा मार्ग स्वीकारणं केव्हाही फायदेशीर ठरेल. परंतू प्रोसेसिंगसाठी गोल्ड लोन कंपन्यांपेक्षा तुम्हाला पैसे मिळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे.

First Published: Tuesday, April 16, 2013, 15:23


comments powered by Disqus