Last Updated: Wednesday, July 17, 2013, 18:46
www.24taas.com, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबईभारतात प्रथमच इंडोस्कॉपीच्या सहाय्यानं अन्ननलिकेतील आठ सेंटीमीटर लांबीचा ट्यूमर बाहेर काढण्यात मुंबईच्या डॉ. विपुलरॉय राठोड यांना यश आलंय. त्यामुळं इंडोस्कॉपी केवळ निदानाचे साधन नाही तर त्याद्वारे मोठ्या आजारांवर उपचारही करता येतात. यावर शिक्कामोर्तब झालंय.
मुंबईच्या सायनमधल्या इंडोस्कॉपी एशियाचे संचालक डॉ. विपूलरॉय राठोड यांनी भारतात प्रथमच इंडोस्कॉपीद्वारे अन्ननलिकेतील 8 सेंटीमीटर लांब आणि 2.5 सेंटीमीटर रुंदीचा ट्यूमर बाहेर काढलाय. कोलकात्याच्या 37 वर्षीय रुग्णानं या ट्यूमरवरील उपचारासाठी भारतातील 17 तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. सर्वांनी त्याला ओपन सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. परंतु डॉ. राठोड यांनी कुठलीही ओपन सर्जरी न करता इंडोस्कॉपीच्या सहाय्यानं हा ट्यूमर यशस्वीरित्या बाहेर काढलाय.
इंडोस्कॉपी हे केवळ निदानाचे साधन नाही तर त्याद्वारे मोठ्या आजारांवर उपचारही शक्य झालेत. विशेष म्हणजे यासाठी ऑपरेशनच्या तुलनेत अत्यल्प खर्च येतो. रुग्णालयात भरती होण्याची गरज नसते. तसंच शरीराची कुठेही चिरफाड केली जात नाही. त्यामुळं रुग्णाची शारीरीक हानी होत नाही.
नव्या टेक्नॉलॉजीमुळं पोटविकाराच्या सर्व मोठ्या आजारांवर ऑपरेशशिवाय इंडोस्कॉपीद्वारे उपचार करणं शक्य झालंय. त्यामुळं इंडोस्कॉपी तंत्रज्ञान रुग्णांसाठी वरदान ठरताना दिसतंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, July 17, 2013, 18:46