Last Updated: Wednesday, June 19, 2013, 22:16
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई माझ्यासोबत निष्ठावान शिवसैनिक आहेत. शिवसेनेचा चेहरा मोहरा बदलणार नाही. शिवसेनेची जी कार्यपद्धती आहे तीच राहणार. सेनेची कार्यपद्धती बदलणार नाही, असे सांगताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमची थीम पार्कची कल्पना चांगली आहे. ही कल्पना सुचायला डोकं लागतं, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांना हाणला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर प्रथमच शिवसेनेचा ४७वा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात बुधवारी पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पवारांवर चांगलेच तोंडसुख घेतले. पवारांनी राज्यातील सरकारमधील खांदेपालट केलं. मात्र, मडक्यांचे काय केलं? विकासकामांच्या कल्पना आम्हांला परदेशात नव्हे तर येथेच सुचतात, अशी कोपरखळी मारली. निवडणुका लागल्या की काँग्रेसवाले पैसे देऊन मते विकत घेतात. या प्रवृत्तीच्या विरोधात शिवसैनिकांना लोकजागृती करावी लागेल. आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी शिवसैनिकांनी तयार राहावे, असे आवाहन उद्धव यांनी केलं.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे सेक्युलरवादाचा सतत पुकारा करीत आहे. त्यांचा विचार आम्हाला मान्य नाही. हिंदुत्वाला चिरडणारा सर्वधर्म समभाव आम्हांला नको. शिवसेना हिंदुत्वाचा विचार मानणारी पक्षसंघटना आहे. भाजप जोपर्यंत हिंदुत्व सोडत नाही तोपर्यंत शिवसेनेची भाजपला साथ राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी दोन महिन्यात राज्यातील लोकसभा मतदारसंघाचा आपण दौरा करणार आहोत. मुंबईतील शिवसेनेच्या प्रत्येक शाखांना भेटी देण्याचा आपला प्रयत्न राहील. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावांमध्ये शिवसेनेची पाटी दिसणार असा शिवसैनिकांनी निर्धार करावा असे ते म्हणाले.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 19, 2013, 22:16