Last Updated: Thursday, October 18, 2012, 09:25
www.24taas.com, मुंबई कांजूर डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्तपध्दतीनं भरलं जात नसल्यामुळे विक्रोळी, कांजूरमार्ग इथल्या दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवासी आजारी पडत आहेत. हे डम्पिंग ग्राऊंड हटवण्यासाठी नुकतंच विक्रोळीतल्या रहिवाशांनी आंदोलन केलं होतं. या डम्पिंगवर उपाय म्हणून मुंबई महापालिकेनं कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय.
मुंबईत सहा हजार मेट्रिक टन कचरा दररोज गोळा होतो. हा कचरा देवनार, मुलुंड, गोराई, कांजुरमधल्या डम्पिंग ग्राऊंडवर आणून टाकला जातो. हे डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पध्दतीनं भरले जातील, असा दावा मुंबई महापालिकेनं केला होता. मात्र, तसं न झाल्यानं परिसरातले रहिवासी आजारी पडू लागले. त्यासाठीच विक्रोळीतल्या रहिवाशांनी आंदोलन केलं होतं. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेनं कचऱ्यापासून ५० मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय.
वीज निर्मितीच्या या प्रयोगाबद्दल विरोधकांनी टीका केलीय. ही योजना प्रत्यक्षात आणण्याआधी कचऱ्यापासून कार्बन क्रेडीट, बायमॅथोलोजिकल प्लान्टची योजना का अपयशी ठरली? याचं उत्तर महापौरांनी द्यावं, अशी मागणी विरोधकांनी केलीय. मुंबई महापालिकेन बेस्टला वीज निर्मितीसाठी देवनारमध्ये भूंखड देत बजेट १९९२-९३ मध्ये आर्थिक तरतूदही केली होती. मात्र, पालिकेनं हा भूंखड विकत वीज निर्मितीची योजनाच गुंडाळली होती.
First Published: Thursday, October 18, 2012, 09:23