Last Updated: Thursday, November 29, 2012, 08:01
www.24taas.com, मुंबई अखेर ‘झी २४ तास’च्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. आजच्या कॅबनिटच्या बैठकीत सिंचनाची श्वेतपत्रिका सादर करण्यात येणार आहे. गुरूवारी सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचं वृत्त ‘झी २४ तास’नं सर्वात आधी (सोमवारी) दिलं होतं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातली सिंचनक्षमता दहा वर्षांत नऊ टक्क्यांनी वाढल्याचा दावा श्वेतपत्रिकेत करण्यात आलाय. विशेष म्हणजे सिंचनाची श्वेतपत्रिका काढल्यानंतर लगेचच अजितदादांचंही मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिंचनाच्या मुद्यावरून गेली सहा सात महिने काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जोरदार महाभारत सुरू आहे. याप्रकाराची परिणती अजितदादांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यात झाली. आता मात्र श्वेतपत्रिका मांडल्यानंतर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात विरोधक श्वेतपत्रिकेचं पोस्टमॉर्टेम करणार यात शंका नाही. त्यामुळं श्वेतपत्रिकेतून नेमकं काय बाहेर येतं, यावर आता सत्ताधारी आणि विरोधकांची खेळी अवलंबून राहणार आहे.
दरम्यान, सिंचन क्षेत्रात नऊ टक्यानं वाढ झाल्याची माहिती समोर आल्यानंतर भाजपनं सरकारवर टीका केली आहे. सरकार लोकांची फसवेगिरी करत असल्याचा आरोप भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. ते अकोल्यात बोलत होते.
First Published: Thursday, November 29, 2012, 07:55