Last Updated: Thursday, June 27, 2013, 19:05
www.24taas.com, अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूरमान्सून सुरू होण्यापूर्वी नालेसफाई, रस्त्यावरचे खड्डे बुजवणं तसंच मॅनहोलवरची झाकणं लावणं गरजेचं असतानाही नागपूर महापालिकेचं या विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आलंय. उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. एका निष्पाप मुलाचा जीव गेल्यानंतर तरी महापालिका यातून धडा घेणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.
नागपूरच्या नंदनवन भागात राहणा-या 11 वर्षांच्या हर्षल मेश्रामचा गुन्हा केवळ इतकाच होता की त्याला रस्त्यावर उघडं असलेलं हे मॅनहोल दिसलं नाही. पण रस्त्यावर 2 फूट पाणी असताना त्याला ते मॅनहोल दिसेल तरी कसं? शहरातल्या मॅनहोलवर झाकणं बसवण्याची जबाबदारी नागपूर महापालिकेची असूनही महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे हर्षल मेश्रामला आपला जीव गमवावा लागला. शहरातले हे काही एकमेव उघडं मॅनहोल नाही. तर नागपुरातल्या अनेक वार्डात आणि मुख्य रस्त्यांवर याप्रमाणं झाकण नसलेले मॅनहोल सर्रास दिसून येतात, असे स्थानिक रहिवासी अरविंद पंडित यांनी सांगितले.
हर्षल मेश्रामचा मृत्यू दुर्दैवी असून हा नागपूर महापालिका कर्मचा-यांच्या निष्काळजीपणामुळंच झाल्याचं महापालिका आयुक्तांनी मान्य केलंय. या दुर्घटनेतल्या दोषींचा शोध सुरू असून संबंधितांवर कारवाईचं आश्वासन आयुक्तांनी दिलंय. तसंच उघडी मॅनहोल आणि गटारांच्या तत्काळ दुरुस्तीचे आदेशही महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी दिले आहेत.
उशिरा जागं झालेलं महापालिका प्रशासन आता कदाचित दोषींवर कारवाई करेलही, पण त्यानं निष्पाप हर्षल काही परत येणार नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 27, 2013, 19:05