Last Updated: Tuesday, January 14, 2014, 20:40
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या नायलॉनचा मांजा धोकादायक ठरतोय. पारंपरिक मांज्यापेक्षा नायलॉन मांजा स्वस्त असला तरीही त्यापेक्षा कितीतरी पट धारदार असल्यानं हा अतिशय घातक आहे. पक्षांकरता जीवघेण्या ठरणाऱ्या या मांज्याने या आधी एका निष्पाप बालकाचा बळीदेखील घेतला आहे. त्यामुळे यावर बंदी आणण्याची मागणी होतेय.
संक्रांतीचे दिवस म्हणजे तीळ-गूळ खाण्याचा आणि पतंग उडवण्याचा सिझन... पण नायलॉनच्या मांज्यामुळे पतंग उडवण्याचा हा उत्सव जीवघेणा ठरतोय. आधी चीनमधून येणारा हा मांजा आता दिल्ली आणि उत्तर भारतात तयार होतो. हा मांजा स्वस्त आणि धारदार असल्यानं याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नागपुरात एकूण वापरल्या जाणाऱ्या मांज्यापैकी ८० % मांजा हा नायलॉन मांजाच असतो. मागणी असल्यानं पतंग-मांजा विक्रेते मोठ्या प्रमाणात याची विक्री करतात, असं पद्मा चौरसिया या विक्रेत्याचं म्हणणं आहे.
याच नायलॉन मांज्यामुळे अवघ्या काही महिन्यांची एक कोकिळाही जखमी झाल्याची घटना इथं घडली होती. २०१२ मध्ये नायलॉन मांज्यामुळे पक्षी जखमी झाल्याच्या ४७ आणि २०१३ मध्ये २८ तक्रारी आल्या होत्या. यावर्षी अशा आत्तापर्यंत तीनच तक्रारी आल्या आहेत. तर या मांज्यामुळे गंभीर जखमा झाल्यानं २० जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय.
खासगी संघटनांबरोबर डॉक्टरांकडूनही नायलॉन मांज्यावर बंदीची मागणी होतेय. तसंच बंदीसोबतच याबद्दल सर्व सामान्य पतंग प्रेमींमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 14, 2014, 15:36