Last Updated: Sunday, December 8, 2013, 14:59
www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील एका दिवंगत माजी मंत्र्याच्या परिवाराच्या खासगी आश्रमशाळेत धूम ३ ने धुमाकूळ घातलाय. आश्रमशाळेतील या धूम ने ४ विद्यार्थ्यांना थेट रूग्णालयात पोहचलंय. आश्रमशाळेतील अधीक्षकाच्या पित्याने नव्या को-या चारचाकी वाहनाचे प्रशिक्षण सुरु केले होते. ते आता त्यांच्या अंगलट आलं आहे.
सामान्य रुग्णालयात वेदनांनी कळवळणा-या विद्यार्थ्यांना शाळेच्यामधल्या सुटीत मैदानावर खेळणं महागात पडलं. कुणाचा पाय मोडलाय, कुणाला रक्ताची धार लागलीय तर कुणी निपचित पडलंय. हे ४ विद्यार्थी यशोधरादेवी अनुदानित खाजगी आश्रमशाळेचे. या आश्रमशाळेत माणिकचंद्र ताडाम हे अधीक्षक आहेत. अधीक्षकांनी ४ दिवसांपूर्वी नवी कोरी `आय-टेन` चारचाकी घेतली. त्यांनी ही गाडी चालवण्यासाठी वडिलांना दिली. थेट आश्रमशाळेच्या पटांगणात गाडी चालवण्याचा त्यांचा सराव सुरू झाला. गाडीवरचं नियंत्रण सुटलं ती पाणी पीत असलेल्या छोट्या मुलांना जावून धडकली. या जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांना मात्र याची माहितीही देण्यात आली नाही.
जखमींपैकी २ विद्यार्थ्यांवर उपचार करून सोडण्यात आलं. तर दोन गंभीर जखमींना दाखल करण्यात आलं. या प्रकरणानंतर शाळा मुख्याध्यापकांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी धनराज ताडाम अटक केलीय. विशेष म्हणजे शाळेच्या पटांगणातच २०० आदिवासी विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतू शकणा-या या धूम-३ ची साधी चौकशी आदिवासी विकास विभाग अथवा शाळा व्यवस्थापनानं अजून केली नाही. त्यामुळे विद्यार्थी ना शाळेत सुरक्षित ना मार्गांवर हे स्पष्ट झालंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, December 8, 2013, 14:44