गुंडाची ठेचून हत्या... हत्येनंतर दुसरी हत्याही उघडकीस, iqbal shaikh dead, nagpur

गुंडाची ठेचून हत्या... हत्येनंतर दुसरी हत्याही उघडकीस

गुंडाची ठेचून हत्या... हत्येनंतर दुसरी हत्याही उघडकीस
www.24taas.com, नागपूर
मंगळवारी सायंकाळी नागपुरात संतप्त जमावानं एका गुंडाला ठेचून ठार मारल्याची खळबळजनक घटना घडली. इक्बाल शेख असं या गुंडाचं नाव आहे. या हत्येनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत इक्बाल शेख आणि त्याचा भाऊ अक्रम यांनी यापूर्वी आणखी एक हत्या केल्याचं सत्य पुढे आलंय.

मंगळवारी, नागपूरच्या वसंतराव नाईक झोपडपट्टीत एका जुगार अड्डयावर इक्बाल शेख आणि अक्रम शेख या दोघा गुंडांनी एका महिलेची छेड काढली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावानं या दोघांचा पाठलाग करुन त्यांना मारहाण केली. ही मारहाण इतकी जबरदस्त होती की, इक्बाल शेख जागेवरच मरण पावला तर अक्रम शेख मात्र घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले पण तो हाती न लागल्यानं संतप्त झालेल्या जमावानं पोलिसांवर तसंच पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करत आपला राग व्यक्त केला. यामध्ये पोलिसांच्या वाहनांचे मोठे नुकसान झालं.
या घटनेनंतर पोलिसांचं चौकशीची चक्र जोरात फिरू लागली. त्यानंतर मात्र, पोलिसांच्या हातात आणखी एक धक्कादायक माहिती हाती लागलीय. इक्बाल शेख आणि त्याच्या भावानं यापूर्वी रोहित नावाच्या व्यक्तीची हत्या केल्याची आता नवी माहिती मिळतेय. मूळचा मध्यप्रदेशचा असलेला रोहित हा इलेक्ट्रिकची कामं करत होता. त्यानं या दोघा भावांकडून पाच लाख रुपये उसने म्हणून घेतले होते. वारंवार मागणी करूनही रोहित पैसे देत नसल्याचं पाहून इक्बाल शेख आणि त्याच्या भावानं रोहितचा काटा काढला, अशी प्राथमिक माहिती मिळतेय.

पैशाच्या वादातून हत्या केल्यानंतर इक्बाल आणि अक्रमनं रोहितचा मृतदेह याच झोपडपट्टीत पुरल्याची माहिती आता पोलिसांना मिळालीय. त्यानंतर इथं खोदकाम करून या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू झालाय.

First Published: Wednesday, October 10, 2012, 14:41


comments powered by Disqus