घोटाळा पोलीस भर्तीचा! - Marathi News 24taas.com

घोटाळा पोलीस भर्तीचा!

झी २४ तास वेब टीम, गडचिरोली
 
राज्यात सुरु झालेली पोलीस भरती प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आलीये. पण या ऑनलाईन प्रक्रियेचा फटका उमेदवारांना बसलाय. ही प्रक्रिया राबवणाऱ्या  VAST च्या वेबसाईटवर कित्येक उमेदवारांची माहितीच अपडेट झाली नाही. त्यामुळं अनेक उमेदवारांना प्रवेशपत्र न मिळाल्यानं त्यांना या संधीला मुकावं लागण्याची भीती आहे.
 
राज्यात सुरु असलेल्या पोलीस भरतीला गडचिरोली जिल्ह्यात जास्त महत्व आहे. या जिल्ह्यात पोलीस भरतीला जाणारा युवक भरतीच्या ६ महिने आधीपासूनच नक्षली हत्येच्या भीतीनं शहरात वास्तव्याला असतो. पण हे अग्निदिव्य पार करत यंदा जिल्ह्यातल्या ४० हजार युवकांनी १०५७ पदांसाठी अर्ज केले आहेत. आधीच भरती प्रक्रिया ऑनलाईन त्यातच VAST च्या ज्या वेबसाईटवर ही प्रक्रिया सुरु आहे त्यात अनेक त्रुटी आहेत.
 
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असल्यानं सायबर कॅफे चालकांना इच्छुक उमेदवारांच्या  रोषाचा सामना करावा लागतोय.  कॅफे चालकांनीही VAST च्या वेबसाईटवर दिलेल्या नंबरवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संबंधीतांकडून फोनच रिसीव्ह केला जात नाहीय.
 

याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आपण हस्तक्षेप करू शकत नसल्याचं सांगत त्यांनी हतबलता व्यक्त केली. गडचिरोलीत उद्योग धंदे नसल्यानं रोजगाराच्या संधी कमी आहेत. अशा वेळी पोलीस भरती प्रक्रियेत त्रुटी राहून बेरोजगारांची संधी हिरावली गेली तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न आहे.

First Published: Thursday, December 1, 2011, 10:31


comments powered by Disqus