यवतमाळमध्ये भीषण पाणी टंचाई - Marathi News 24taas.com

यवतमाळमध्ये भीषण पाणी टंचाई

श्रीकांत राऊत, www.24taas.com, यवतमाळ
 
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभारात नियोजनाचा अभाव असल्यामुळे यवतमाळ शहरात नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. यवतमाळकरांची तहान भागवण्यासाठी असलेला निळोणा प्रकल्प आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी चार-पाच दिवस वाट पाहावी लागतेय. त्यातच टँकरने होणारा पाणीपुरवठाही बंद झाल्याने पाण्याचा ठणठणाट आहे.
 
यवतमाळला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन प्रकल्पांपैकी निळोणा प्रकल्प कोरडा पडला आहे तर चापडोह प्रकल्पातही आता काही दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासियांना आठवड्यातून केवळ दोनदा आणि तोही काही वेळापुरताच पाणी पुरवठा होतोय. या भीषण पाणीटंचाईला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा नियोजनशून्य कारभार कारणीभूत आहे. अशातच नगरपालिकेकडेही 40 वॉर्डांसाठी केवळ 10 टॅँकर उपलब्ध आहेत. पाणी टंचाईमुळे संतापलेल्या नागरिंकाकडून टॅँकरचालकांना मारहाणीच्या घटना झाल्यामुळे या टॅँकरचालकांनीही पाण्याचा पुरवठा बंद केलाय. त्यामुळे आता नागरिकांना पाण्याच्या ठणठणाटाला सामोरं जावं लागतंय.
 
पाणी मिळत नसल्याने नगर परिषद आणि जीवन प्राधिकरणावर लोकांचे मोर्चे निघत आहेत. अधिकारी मात्र लोकांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला समोर येणंच टाळत आहेत. आणखी 15 दिवस पाऊस न आल्यास यवतमाळ शहरात पाण्यासाठी हाहःकार उडणार हे निश्चित...
 

First Published: Sunday, June 10, 2012, 11:58


comments powered by Disqus