चंद्रपूरमधील कोल वॉशरी बंद - Marathi News 24taas.com

चंद्रपूरमधील कोल वॉशरी बंद

www.24taas.com, चंद्रपूर
 
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रासाठी धुतलेला कोळसा पुरवण्यासाठी उभालेल्या कोल वॉशरी बंद केल्यानं कामगारांवर आत्महत्येची पाळी आलीय. अनेक कामगारांनी जमिनीच्या बदल्यात नोकरी दिली गेली असल्यानं, त्यांच्याकडे रोजगाराचा दुसरा पर्यायही राहिलेला नाही. वॉशरिजमध्ये कोळसा धुतला जात नसल्यानं महाजेनकोनं घेतलेला निर्णय कामगारांच्या मुळावर आलाय.
 
वीज निर्मितीसाठी कोळशाचा दर्जा सुधारावा यासाठी महाजेनकोनं वॉशड् कोल पुरवण्याचे परवाने दिले. यातली कमाई पाहून मोठ्या उद्योजकांनी पाच कोल वॉशरी उभारल्या. यासाठी शेतक-यांची जमिनी अधिग्रहित करून त्यांच्या वारसांना नोक-या देण्यात आल्या. हा उद्योग पाच वर्ष चालला. मात्र वॉशरीकडून कोळसा धुतला जात नसल्यानं महाजेनकोनं वॉशड् कोल घेण्यास नकार दिला. परिणामी वॉशरीतल्या सुमारे पाच हजार कामगारांवर बेकारीची कु-हाड कोसळलीय.
 
कामगार आणि कोल वॉशरी कंपन्यांमध्ये समेट घडविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र दुसरीकडे वीज केंद्राच्या परिसरातच वॉशरी उभारण्याचा प्रस्ताव असल्याची चर्चा आहे. परिणामी बंद पडलेल्या वॉशरी महाजेनकोनं चालवण्याची सूचना खासदार हंसराज अहिर यांनी केलीय.
 
पाच हजार कामगारांवर बेकारीची कु-हाड पडलेली असताना कामगार संघटनांनी आश्चर्यकारकरित्या मौन बाळगलंय. जमीन आणि नोकरी गमावलेल्या कामगारांनी लवकर न्याय देण्याची गरज निर्माण झाली आहे.

First Published: Thursday, July 12, 2012, 22:08


comments powered by Disqus