Last Updated: Saturday, December 17, 2011, 03:16
झी २४ तास वेब टीम, नागपूर विधान भवनात कुठल्याच मुद्द्यावर एकत्र न येणारे सत्ताधारी पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे आमदार विद्या बालनच्या अदा पाहायला एकत्र आले. नागपूरच्या सिनेमॅक्स थिएटरमध्ये हा खास शो आयोजित केला होता. शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मंत्री आणि आमदार असे एकूण २५ आमदार 'दि डर्टी पिक्चर' पाहायला एकत्र आले होते.
नागपूरच्या थंडीत अधिवेशनाचं कामकाज तापलं असताना काल रात्री अनेक पक्षांच्या आमदारांनी विरंगुळ्यासाठी थेट थिएटर गाठलं आणि ‘डर्टी पिक्चर’ पाहिला. विद्याच्या मादक अदांनी सर्वांना परिचित झालेल्या या सिनेमाला आमदारांची उपस्थिती असल्याचं कळताच मीडियाचे कॅमेरे तिकडे पोहचले, तेव्हा आमदारांचीही पळापळ झाली. ‘डर्टी पिक्चर’ संपला तरी आमदार बाहेरच यायला तयार नव्हते. काहींनी तर डर्टी पिक्चरनंतर अडीच तास थांबून ‘मिशन इम्पॉसिबल’चा शोदेखील पाहिला.
खरं तर सेन्सॉरनं मान्यता दिलेला ‘डर्टी पिक्चर’ पहाण्यात गैर काहीच नाही. पण विद्याच्या अदांमुळे लोकांमध्ये या सिनेमाची चर्चा असल्यानं उगाच कॅमेऱ्यासमोर यायला नको अशी काही आमदारांची इच्छा होती. एका आमदारानं तर ‘हेल्मेट’ घालून थिएटरमधून काढता पाय घेतला.
First Published: Saturday, December 17, 2011, 03:16