कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार - Marathi News 24taas.com

कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार

झी २४ तास वेब टीम, नागपूर
 
ज्येष्ठ कवी ग्रेस ऊर्फ माणिक गोडघाटे यांना २०११चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. ‘वाऱ्याने हलते रान' या त्यांच्या ललितबंध संग्रहाला हा सन्मान मिळाला आहे.
 
या पुरस्काराचे स्वरून एक लाख रुपये रोख, शाल व सन्मानपत्र, असे असून, २१ फेब्रुवारी २०१२ रोजी येथे होणाऱ्या अक्षरांच्या उत्सवा'मध्ये त्याचे वितरण होईल.  देशभरातील २२२ साहित्यिकांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून, त्यात ग्रेस हे एकमेव मराठी साहित्यिक आहेत.
 
 
संध्याकाळच्या कविता, राजपुत्र आणि डार्लिंग, सांध्यपर्वातील वैष्णवी, चंद्रमाधवीचे प्रदेश, सांजभयाच्या साजणी, हे काव्यसंग्रह, तसेच चर्चबेल, मितवा, संध्यामग्न पुरुषाची लक्षणे, मृगजळाचे बांधकाम, वाऱ्याने हलते रान,  कावळे उडाले स्वामी' हे ग्रेस यांचे ललितबंधसंग्रह प्रसिद्ध आहेत.
 
 
गेली ४५ वर्षे अखंड काव्यसाधना करणारे ग्रेस यांच्या शब्दकळेने ज्याला मोहित केले नाही, असा काव्यरसिक विरळा. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस कधीचा पडतो,  घर थकलेले संन्यासी'पासून ते भय इथले संपत नाही पर्यंतच्या त्यांच्या अनेकानेक गीतांनी मराठी माणसावर गारुड केलेले आहे. अनोख्या प्रतिमा, वेगळी प्रतीके यांची अद्भुत गुंफण करीत, नाद-लयीची पैंजणे लेऊन येणारी ग्रेस यांची कविता आशयाच्या, अर्थांच्या अशा काही विजांचा साक्षात्कार घडवते की थक्क होऊन जावे.
 
 
कोकणीतील प्रक्रितीचो पास  या काव्यसंग्रहासाठी मेल्विन रॉड्रिग्ज, इंग्लिशमधील इंडिया आफ्टर गांधी, या साहित्यकृतीसाठी रामचंद्र गुहा यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.  चंद्रपूर येथे फेब्रुवारीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी वसंत आबाजी डहाके यांच्यासह म. द. हातकणंगलेकर व रा. रं. बोराडे यांच्या तीनसदस्यीय ज्युरी समितीने ग्रेस यांची निवड यंदाच्या सन्मानासाठी केली, अशी माहिती साहित्य अकादमीने दिली.

First Published: Thursday, December 22, 2011, 06:46


comments powered by Disqus