भाजपचं 'डर्टी' कांड, राष्ट्रवादीचं भांडवल! - Marathi News 24taas.com

भाजपचं 'डर्टी' कांड, राष्ट्रवादीचं भांडवल!

अखिलेश हळवे, www.24taas.com, नागपूर
 
कर्नाटक विधानसभेतल्या मंत्र्यांच्या मोबाईलवर ब्लू फिल्म पहाण्याच्या प्रकरणामुळे विरोधकांना भाजपवर टीका करण्यासाठी आयतं कोलीत मिळालं आहे. मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
 
मनपा निवडणूकांमध्ये आता कर्नाटकचा मुद्दा गाजतोय. मात्र हा प्रश्न सीमावादाचा नसून मोबाईल कांडाचा आहे. कर्नाटकातील भाजपच्या तीन मंत्र्यांनी भर विधानसभेत मोबाइलवर ब्लू फिल्म पाहिली आणि आपलं पद गमावलं. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना म्हणजे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत ठरली. पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना अजित पवारांनी भाजपला टीकेचं लक्ष्य केलं. तर नागपूरच्या प्रचारसभेत राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
 
राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांसाठी ज्वलंत प्रश्नांची कमतरता नाही. पण फोडणीसाठी एकादा नवीन खमंग मुद्द हवा हे जाणूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता भाजपला घेरण्याची तयारी केली आहे.

First Published: Friday, February 10, 2012, 13:17


comments powered by Disqus