होळीनिमित्त बंजारा समाजाचं 'लेंगी नृत्य' - Marathi News 24taas.com

होळीनिमित्त बंजारा समाजाचं 'लेंगी नृत्य'

श्रीकांत राऊत, 24taas.com, यवतमाळ
 
आज देशभरात होळीचा उत्सव साजरा होत आहे. विविध ठिकाणी होळी साजरी कऱण्याच्या अनोख्या परंपरा आहेत. बंजाराबहुल यवतमाळ जिल्ह्यात सध्या तांड्यातांड्यावर लेंगी नृत्याची धमाल अनुभवायला मिळत आहे.
 
यवतमाळ जिल्ह्यातल्या बंजारा समाजाच्या प्रत्येक तांड्यावर सध्या लेंगी नृत्याची अशी धमाल दिसत आहे. पाल, फाग आणि गेर असे तीन दिवस बंजारा समाजात होळीचा उत्सव साजरा करण्यात येतो. लेंगी नृत्य हे यातलं प्रमुख आकर्षण असतं. बंजारा गीत आणि नृत्यातून देवी-देवता, महापुरुषांची महती सांगण्याची आणि त्यातून समाज प्रबोधनाची ही एक अतिशय प्राचीन परंपरा आहे.
 
प्रत्येक तांड्यातून पुरूष प्रतिनिधी म्हणून गेर आणि महिला प्रतिनिधी म्हणून गेरिया हे होळी उत्सवासाठी निधीची व्यवस्था करतात. रंग, नाचगाणे आणि खानपानाची या उत्सवादरम्यान रेलचेल असते.  तांड्यावर समूह वस्ती करून राहणारा बंजारा समाज, आधुनिक युगातही आपली परंपरा टिकवून आहे. एवढंच नव्हे तर पर्यायानं समाजप्रबोधनाचा वसाही कायम ठेवून आहे.
 

First Published: Wednesday, March 7, 2012, 09:27


comments powered by Disqus