उदास सरकार शेतकरी बेजार, आत्महत्या वारंवार - Marathi News 24taas.com

उदास सरकार शेतकरी बेजार, आत्महत्या वारंवार

झी २४ तास वेब टीम, अकोला
 
विदर्भात शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं. गेल्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत वाढ झाली. अकोला जिल्ह्यातल्या पाळोदी इथल्या एका कापूस उत्पादक शेतकऱ्यानं काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली.
 
शेतातील नापिकी, शेतीसाठी घेतलेले बँकेचं कर्ज यातून आलेल्या वैफल्यातून अकोला जिल्ह्यातल्या पाळोदी गावातल्या गजानन वक्ते या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. दोन एकर कोरडवाहू शेतीत पारंपारिक कापसाची शेती गजानन करत असे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून शेतीनं दगा दिल्यानं खाजगी आणि बँकांचे कर्ज वाढत गेले. या वैफल्यातूनच त्यानं आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतं. मात्र त्याच्या या निर्णयानं त्याची चार मुले आणि पत्नी उघड्यावर आलेत.
 
२००५ चे राज्य सरकारचे आर्थिक पॅकेज, २००६ चे पंतप्रधान पॅकेज आणि २००९ ची शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी योजना. मात्र हे सर्व तात्पुरत्या मलमपट्टया ठरल्याचं समोर येतं. शेतमालाला योग्य भाव मिळाला तर आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही. असं शेतकऱ्यांच म्हणणं आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे मूळ इथल्या शेतमालाला न मिळणाऱ्या भावात दडलंय. मात्र 'जखम डोक्याला आणि पट्टी पायाला' बांधणाऱ्या सरकारला या प्रश्नाचं गांभीर्यच नाही.

First Published: Sunday, November 13, 2011, 06:41


comments powered by Disqus