Last Updated: Monday, March 26, 2012, 22:36
www.24taas.com, दीपक भातुसे-मुंबई स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीवरून विरोधी पक्षांबरोबरच काँग्रेसनंही अर्थमंत्री अजित पवारांना खिंडीत गाठून दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे..... दरवाढीमुळे सर्वसामान्यांचा रोष वाढणार हे लक्षात येताच काँग्रेसनं विरोधाची भूमिका घेतली.... विरोधकांनी राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला असतानाच काँग्रेसच्या विरोधामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादीलाही बॅकफूटवर यावं लागलं.... त्यामुळे काँग्रेस नेत्यांना कामकाजावरून टोला लगावतानाच विरोध कमी करण्यासाठी प्रयत्न करू असं सांगत अजितदादांनी दरवाढ मागे घेण्याचे संकेत दिलेत.
अजित पवारांनी राज्याचं बजेट मांडल्यानंतर काही तासांतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी मांडलेल्या या दोन वेगवेगळ्या भूमिका..... सत्ताधारी म्हणून आधी बजेटचं तोंडभरून कौतुक नंतर आपण जनतेबरोबर आहोत हे दाखवण्याच्या धडपडीतून माणिकरावांनी केलीय. खरं तर अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी हे बजेट सादर केलं, त्या सरकारमध्ये काँग्रेसही भागीदार आहे.... पण गॅस दरवाढीच्या मुद्यावर जनतेचा रोष सहन करावा लागणार हे ओळखून काँग्रेसनंही ममता स्टाईल भूमिका घेतली आणि त्यातही जिल्हा परिषदेत काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवणा-या अजितदादांना खिंडीत गाठलं.
काँग्रेसनं कोंडी केल्यानं आता दबावाला अजितदादा झुकणार का असा प्रश्न निर्माण झालाय.... काँग्रेस नेत्यांना टोले लगावताना अजितदादांनी काहीशी माघार घेण्याचे संकेत तरी दिलेत.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीत राष्ट्रवादीनं नुकतचं शिवसेना-भाजपशी अनेकवेळा हातमिळवणी करत काँग्रेसला धोबीपछाड दिली, त्यामुळं महत्त्वाच्या प्रश्नांवर जनतेसमवेत आहे हे दाखवून काँग्रेस या निमित्तानं अजित पवारांसारख्या राष्ट्रवादीच्या प्रमुख मंत्र्यांना टार्गेट करु पाहतंय. एका प्रकारे एका दगडात दोन पक्षी मारण्याचा हा प्रयत्न नाही ना अशी चर्चा या निमित्तानं सुरु आहे.
First Published: Monday, March 26, 2012, 22:36