Last Updated: Friday, October 12, 2012, 13:16
www.24taas.com, चंद्रपूर चंद्रपूर शहरात घरफोडी करणाऱ्या शाळकरी मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भीक मागण्याचं नाटक करून संधी मिळताच घरफोडी करण्याची त्यांची पद्धत होती. त्या शाळकरी मुलांकडून अडीच लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आलेत.
चंद्रपूरमधील वेस्टर्न कोल्डफिल्ड्स खाण कामगारांच्या वसाहतीत झालेल्या चोरीचा तपास करताना दूर्गापूर पोलीसांसमोर एक धक्कादायक वास्तव समोर आलं. या वसाहतीत काही लहान मुलं नेहमी भीक मागण्यासाठी येत असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर श्वानपथकाच्या सहाय्यानं पोलिसांनी वसाहतीपासून काही अंतरावर असलेल्या दूर्गापूर भागातल्या वस्तीतून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. नजिकच्याच शाळेत सातवी आणि नववीत शिकणारी अवघ्या १६ वर्षे, १५ वर्षे आणि १२ वर्षे वयाच्या या मुलांचे पालक मजूर आहेत. दुपारच्या सुमारास वसाहतींमध्ये शिरून भीक मागायची आणि संधी साधून चोरी करायची अशी त्यांची ‘मोडस ऑपरेंडी’ आहे. पोलिसांनी या तिघांकडून अडीच लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसह काही मोबाईलही जप्त केलेत.
मौज-मस्ती आणि खाण्या-पिण्यासाठी चोरी करत असल्याची कबुली या तिघांनी दिली. विशेष म्हणजे, या मुलांना आपल्या कृत्याचा जराही पश्चात्ताप नव्हता. गुन्हेगारी मार्गावर चालणाऱ्या या शाळकरी मुलांना वेळीच योग्य मार्ग दाखवणे गरजेचं आहे.
First Published: Friday, October 12, 2012, 09:08