Last Updated: Sunday, March 16, 2014, 22:47
www.24taas.com, झी मीडिया, यवतमाळयवतमाळ जिल्ह्यातील बंजारा तांड्यांवर सध्या लेंगी उत्सवाची धूम असून होळीतील पारंपारिक लेंगी नृत्य स्पर्धा देखील आयोजित केल्या जात आहे. भटका समाज असलेला बंजारा देशभर विखुरलेला असल्याने लेंगी नृत्य स्पर्धेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक सामील झालेत.
संस्कृती, चालीरिती जपत आकर्षक पोशाखात स्वबोलीच्या तालावर ही मंडळी थिरकतायत. यांत महिलाही मागं नाहीत. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांचाही तोच दांडगा उत्साह. हा आहे बंजारा समाज. सध्या यवतमाळ जिल्ह्यातल्या बंजारा तांड्यांवर अशाप्रकारे लेंगी उत्सवाची धूम आहे. प्रत्येक तांड्यांवर होळीच्या १५ दिवस आधी लेंगीचा सूर ऐकायला येतो.
दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला होळीच्या दिवशी सुरुवात होते. या दिवशी गावातील नायकाच्या घरासमोर पुरुष मंडळी जमा होऊन गाणे गात नृत्य सादर करतात. होळीमध्ये लेंगी गीत, नृत्य, डफडीचा ताल धरला जातो. लेंगी गीतामध्ये होळीचे वर्णन असते. या गीतावर स्त्री-पुरुष गोलाकार नाचतात. इतरत्र होळी रात्री पेटवली जाते. मात्र बंजारा समाजात होळी दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता पेटवण्यात येते.
विखुरलेल्या बंजारा समाजाच्या सर्व लोकांनी एकत्र यावं या उद्देशानं लेंगी महोत्सव साजरा केला जातो. शिवाय यातून सादर होणाऱ्या लेंगी गीतांमधून समाज प्रबोधनही होतं.
ज्या दिवशी होळीचं दहन केलं जातं त्याच दिवशी धूळवड खेळली जाते. नृत्याच्या तालावर लेंगी म्हणत प्रत्येकाची घरी जाऊन गेर मागण्याची बंजारा समाजात प्रथा आहे. पारंपरिक पद्धतीनं हा उत्सव साजरा करत बंजारा समाजानं सांस्कृतिक ठेवा जतन करुन ठेवलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, March 16, 2014, 15:04