नाशिक नगरीत आनंद चित्र रामायण Anand Chitra Ramayana in Nashik

नाशिक नगरीत आनंद चित्र रामायण

नाशिक नगरीत आनंद चित्र रामायण
www.24taas.com, नाशिक

प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक नगरीत आनंद चित्र रामायण साकारतंय. नाशिकचे चित्रकार आनंद सोनार यांनी रामायणातील विविध 150 प्रसंगाची जवळपास दीड हजार चित्र रेखाटली आहेत. 70 फूट लांबीच्या पेपरवर रेखाटलेली ही चित्र अदभूत असून गिनीज बुक मध्ये त्याची नोंद व्हावी यासाठी सोनार कुटुंबियांचा प्रयत्न सुरू आहे.

नाशिकच्या पंचवटीतील हिरावाडीत राहणारे हे आहेत 75 वर्षीय आनंद सोनार....आपल्या 10 बाय 15 फुटांच्या छोटेखानी कार्यशाळेत गेल्या दोन वर्षांपासून ते चित्र रामायण साकारतायेत. प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मापासून त्यांनी भोगलेला वनवास सीताहरण, लंका दहन, राम भरत भेट, हनुमान आणि वानरसेनेचा पराक्रम, सीतेची अग्निपरीक्षा, राम रावण युद्ध, रावणाचा वध असे एक दोन नव्हे तर दीड हजाराहून अधिक प्रसंग त्यांनी रेखाटले आहेत. सोनार यांची इतरही चित्र पाहण्याजोगी आहेत. भारतीय संस्कृती, पौराणिक कथांचा विदेशात प्रसार आणि प्रचार व्हावा हा सोनार यांचा मूळ उद्देश आहे. परदेशातूनही त्यांच्या चित्रांना मोठी मागणी आहे.

चित्रांप्रमाणे सोनार यांचा जीवनप्रवासही विलक्षण असाच राहिलाय. लहानपणी घरची परिस्थिती बेताची असल्यानं अधर्वट शिक्षण सोडून सोनार यांनी नोकरीला प्राधान्य दिलं. तलाठी, गटविकास अधिकारी म्हणून सरकारी नोकरी बजावली. मात्र मूळ पिंड कलाकाराचा असल्यानं वयाच्या चाळीसाव्या वर्षी जीडी आर्टची पदवी संपादन करून सरकारी नोकरीला रामराम ठोकला आणि आपल्यातील कलाकाराला मनसोक्त चौफेर उधळू दिलं. यातून तयार झाल्या एकाहून एक अप्रतिम देखण्या कलाकृती. त्यांच्याकडून आलेले कलागुण पुढच्या पिढीनंही जपले आहेत हे विशेष....

ज्याठिकाणी प्रभू श्रीराम वनवासाला आले, ज्या ठिकाणी सीतेच हरण झालं आणि ख-या अर्थानं रामायण घडलं त्याच गोदातीरावर आज चित्रांच्या रूपानं रामायणानं पुन्हा साकारलं जातयं.. आता या भव्य कलाकृतीचा यथोचित सन्मान करण्यासाठी गिनीज बुकात नोंद व्हावी यासाठी त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत.

First Published: Sunday, December 16, 2012, 20:56


comments powered by Disqus