‘भोंदू’च्या आहारी जाऊन गर्भवती महिलेला मारहाण, nashik bhondu baba, woman beaten by her maternal people

‘भोंदू’च्या आहारी जाऊन गर्भवती महिलेला मारहाण

‘भोंदू’च्या आहारी जाऊन गर्भवती महिलेला मारहाण
www.24taas.com, नाशिक

एका भोंदू बाबाच्या सांगण्यावरून सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केल्याची तक्रारक एका विवाहितेनं पोलिसांत नोंदवलीय. पोटात मुलीचा गर्भ वाढत असल्याने एका बाबाच्या सांगण्यावरून सासरच्या मंडळींनी गर्भपात केल्याचा आरोप या महिलेनं केलाय.

गेल्या वर्षी जून महिन्यात लग्न झालेली ही विवाहिता पाच-सहा दिवसांपासून मामाच्या घरी राहतेय. पतीसह सासरच्या मंडळींनी मारहाण करून गर्भपात केल्याचा गंभीर आरोप तिने केलाय. निफाड तालुक्यातील एका बाबाच्या सांगण्यावरून सासरच्यांनी मारहाण केल्याचा आरोप तीनं केलाय. तिच्या पोटात मुलीचा गर्भ वाढतोय आणि तो अपशकुनी आहे, असं सांगणाऱ्या बाबाच्या आहारी जाऊन सासरच्या लोकांनी या महिलेला मारहाण केलीय. या प्रकरणी विवाहिता आणि तिच्या नातेवाईकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलीय.

विवाहित महिलेला मारहाण झाल्यानंतर तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्यावेळी तिने दिलेल्या फिर्यादीत गर्भपात झाल्याचं म्हटलंय. त्यामुळे या संदर्भात कारवाई करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय.

या प्रकरणात वैद्यकीय तपासणीचा अहवाल आणि न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांच्या कारवाईची दिशा ठरणार आहे. हा भोंदू बाब कोण आहे? त्याचा या सर्व प्रकरणाशी काही संबंध आहे का? या सगळ्या गोष्टी पुढील तपासात स्पष्ट होणार असून त्या दृष्टीने कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, याप्रकरणी भोंदूबाबाला अटक करण्याची मागणी अंनिसचे कार्याध्यक्ष महेश दतरंगे यांनी केलीय.

First Published: Saturday, April 13, 2013, 11:51


comments powered by Disqus