नाशकात चिठ्ठीची कमाल, राष्ट्रवादीला लॉटरी - Marathi News 24taas.com

नाशकात चिठ्ठीची कमाल, राष्ट्रवादीला लॉटरी

www.24taas.com, नाशिक
 
विधान परिषदेच्या नाशिक मतदार संघाचा निकाल अखेर नाट्यमय पद्धतीनं लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जयंत जाधव यांनी शिवसेनेचे उमेदवार शिवाजी सहाणेंचा चिठ्ठी पद्धतीनं पराभव केला. जयंत जाधवांना नशीबानं साथ दिल्यानं जास्त मतांची जमवाजमव करूनही शिवसेनेच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला.
 
विधान परिषदेच्या नाशिक मतदार संघाच्या निकालात चिठ्ठीचा कौल नशीबानं राष्ट्रवादीच्या जयंत जाधव यांच्या बाजूनं लागला. समान मते मिळाल्यानं अखेर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यात जयंत जाधव विजयी झाले. पहिल्या मतमोजणीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सारखीच म्हणजे प्रत्येकी 224 मते मिळाली. त्यानंतर फेरमोजणी घेण्यात आली.
 
फेरमोजणीत  दोघांना सारखीच मतं मिळाली. त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण झाला होता. याबाबत राज्य निवडणूक आयोगानं अहवाल मागवल्यानंतर चिठ्ठी टाकून निकाल लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यातही राष्ट्रवादीचे जयंत जाधव आणि शिवसेनेचे शिवाजी सहाणे यांच्यात जोरदार चुरस झाली. मात्र अखेर नशिबानं राष्ट्रवादीच्या जयंत जाधवांच्या बाजूनं कौल दिला. आणि जाधव दुस-यांदा आमदार झाले.
 
या निकालाला कोर्टात आव्हान देण्याची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. शिवसेनेचा या निवडणुकीत पराभव झाला असला तरी 80 मतांवरून 224 पर्यंतची मजल मारुन एका अर्थानं त्यांनी भुजबळांच्या नाशिकमधल्या राजकारणाला मोठा धक्का दिला आहे.
 
 
व्हिडिओ पाहा..
 

 
 
 

First Published: Tuesday, May 29, 2012, 08:26


comments powered by Disqus