Last Updated: Tuesday, May 29, 2012, 20:28
www.24taas.com, नाशिक विधानपरिषदेचा आखाडा हा त्या त्या जिल्ह्यातल्या नेत्यांच्या संपर्काची आणि वर्चस्वाची सत्वपरीक्षा असते. पण नाशिकमधला विधानपरिषदेचा निकाल पाहता, आता नाशिकचे वारे भुजबळ म्हणतील त्या दिशेला वाहत नाहीत, हे स्पष्ट झालंय.
फक्त नशीब जोरात होतं म्हणून राष्ट्रवादीच्या जयंत जाधवांचा विधानपरिषद निवडणुकीत विजय झाला. शिवसेनेच्या उमेदवारानं राष्ट्रवादीची चांगलीच दमछाक केली. भुजबळांच्या आघाडीची दोन चार नव्हे तब्बल ५४ मतं फुटली. गेली काही वर्षं भुजबळ म्हणतील त्या दिशेनं नाशिकचे वारे वहात होते. पण महापालिका निवडणुकांपासून अनेक जण दुखावल्यानं वा-यांनी आपली दिशा बदलली. गजानन शेलार आणि माणिकराव कोकाटेंनी भुजबळांना उघड आव्हान दिलं होंतं. महापालिका निवडणुकांमध्ये मनसेन जोर दाखवून दिला आणि तेव्हापासूनच भुजबळांचा खडतर प्रवास सुरू झाला.
भुजबळांच्या गढीला त्यांच्या जवळच्याच चौकडीनं खिंडार पाडलं. या कोंडाळ्यामुळे अनेक कार्यकर्ते दुरावले. त्यातच संपूर्ण जिल्ह्यात एकछत्री अंमल प्रस्थापित करण्याची भुजबळांची महत्त्वाकांक्षाही नडली. विधानपरिषद निवडणुकीचा निकाल भुजबळांसाठी धोक्याची घंटा आहे. भुजबळांच्या या नाराजीचा फटका समीर आणि पंकजलाही बसण्याची चिन्हं आहेत. नगरसेवक, शहराध्यक्ष आणि आमदारही उघडपणे बोलू लागल्यानं भुजबळांसाठी पुढची वाट नक्कीच अवघड आहे.
First Published: Tuesday, May 29, 2012, 20:28