Last Updated: Friday, June 22, 2012, 09:03
www.24taas.com, नाशिकलाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ब्रह्मगिरीवर आता चार ते पाच मजली बांधकामं सुरु झाली आहेत. पर्यावरणाच्या नियमांना हरताळ फासत हा प्रकार सुरू झालाय, हे तर उघडउघड सत्य आहे. धक्कादायक बाब म्हणजे राजकारणीही ब्रह्मगिरीवर कब्जा करण्याच्या स्पर्धेत आहेत.
हिरव्यागार कुशीत वसलेलं ब्रह्मगिरी... लाखो भाविकांचं श्रद्धास्थान... इथल्याच गंगाद्वाराजवळ गोदावरीचा उगम झाला आणि तिनं राज्यभरात हरितक्रांती केली. आता थेट तिच्या उगमाच्या ठिकाणीच जेसीबीचे घाव घातले जातायत. पर्वताचे ठिकठिकाणी लचके तोडले जातायेत... पर्यावरणाचे नियम धाब्यावर ठेवत चार पाच मजली बांधकाम सुरू झालंय. शेकडो झाडांवर कुऱ्हाड पडलीय. ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या त्र्यंबकेश्वरातले नागरिक या प्रकारामुळे व्यथित झालेत.
नाशिकला स्वच्छ आणि सुंदर वातावरण देणारा नाशिकचा हिमालयच आता विकला जातोय. जागा मिळेल तिथे सपाटीकरण करून कुठे बंगले तर फार्म हाउस डौलात उभी राहतायत. त्यामुळे भूस्खलन तसच दरडी कोसळण्याचा धोका वाढलाय. स्थानिक प्रशासन आणि वन विभागाच्या आशिर्वादाने होणाऱ्या निसर्गावरच्या या अतिक्रमणाबाबत सगळेच मूग गिळून गप्प आहेत. राज्यातले मंत्री आणि नेतेही ब्रह्मगिरीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहेत. पर्यावरण विभागानं धोरण अधिक कडक केलं नाही तर नाशिकचा ऱ्हास अटळ आहे.
.
First Published: Friday, June 22, 2012, 09:03