Last Updated: Friday, June 29, 2012, 22:23
www.24taas.com, नाशिक सर्वसामान्य नाशिककर आणि शेतकरी पाणीटंचाईचा सामना करत असतानाच आता उद्योग क्षेत्रालाही त्याच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. मंदीतून सावरतो न सावरतो तोच आता पावसानं दगा दिल्यानं उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.
नाशिकच्या धरणांमध्ये दहा ते बारा टक्केच पाणीसाठा असल्यानं पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येतंय. त्यामुळे शेतीसाठी आणि उद्योगासाठीच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आलीय. नाशिकच्या अंबड आणि सातपूर या औद्योगिक वसाहतीत कमी दाबानं पाणीपुरवठा होतोय. आठ दिवस पाऊस आला नाही, तर यामध्ये आणखी कपात केली जाणार आहे.
पॅकेजिंग, प्रोसेसिंग आणि कुलिंगसाठी पाण्याची आवश्यकता असते. पण आता पुरेसं पाणीच उपलब्ध होत नसल्यानं उद्योगांवर विपरित परिणाम होतोय. नाशिकमधल्या जवळपास चारशे चे पाचशे उद्योगांवर परिणाम होऊ लागलाय. जागेचे भाव प्रचंड वाढल्यानं जेवढी जागा उपलब्ध होते, तेवढ्या जागेचा वापर फक्त उत्पादन वाढवण्यासाठी केला जातो. पाणी साठवण्यासाठी वेगळी जागाच मिळत नाही. सहाजिकच उद्योगांकडे पाणीसाठा नाही. त्यामुळे आता पावसा लवकर ये, अशी विनवणी बळीराजाबरोबर उद्योजकही करु लागलेत
First Published: Friday, June 29, 2012, 22:23