Last Updated: Wednesday, December 14, 2011, 10:11
झी २४ तास वेब टीम, नाशिक वैद्यकीय क्षेत्रात दलालांचा सुळसुळाट किती घातक ठरणारा आहे, त्याची ही बातमी. नाशिकच्या वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश देतो, असं सांगून बंगळुरुच्या एका डॉक्टरची फसवणूक करण्यात आली. त्याला तब्बल पंचावन्न लाखांचा गंडा घालण्यात आलाय.
नाशिक पोलिसांनी अटक केलेला हा आरोपी. हा कुठलाही गँगस्टार नव्हे तर हा आहे मेडिकल कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळवून देणारा दलाल. नाशिकमधल्या वसंतराव वैद्यकीय महाविद्यालयात रेडिओलॉजीच्या कोर्ससाठी प्रवेश मिळवून देतो, असं सांगत त्यानं अनेकांना गंडा घातलाय.
यावेळी त्याचं सावज होतं बंगळुरुमधला डॉक्टर मोहन डॉक्टर मोहन यांना तो बंगळुरुहून नाशिकला घेऊन आला. सगळे व्यवहार रोखीनं होतील असं सांगत, त्यानं डॉक्टर मोहन यांच्याकडून तब्बल पंचावन्न लाख रोख घेतले. महाविद्यालयातून ऍडमिशन लेटर घेऊन येतो, असं सांगत तो पंचावन्न लाख घेऊन पसार झाला.
डॉक्टर मोहन यांनी एमडीची पदवी घेण्यासाठी केरळमधली सगळी शेती विकली. त्यामधून आलेले पैसे या दलालांच्या हाती दिले. पोलिसांनी मार्टिन नावाच्या दलालाला अटक केलीय. आणखी दोघांचा शोध सुरू आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी डॉक्टर मोहन यांनी आयुष्यभराची पुंजी पणाला लावली. पण वैद्यकीय क्षेत्रातल्या काळ्या बाजारामुळे पैशाबरोबरच डॉक्टर मोहन यांची स्वप्नंही धुळीला मिळालीयत.
First Published: Wednesday, December 14, 2011, 10:11