Last Updated: Saturday, December 24, 2011, 16:05
झी २४ तास वेब टीम, नाशिक नाशिकच्या इंदिरानगरमध्ये आता पासूनच प्रचाराला सुरूवात झालीय. त्या वॉर्डातून मनसेच्या तिकीटासाठी सात महिला उमेदवार इच्छुक आहेत. तसंच त्यांनी दिलेल्या परीक्षेचा निकालही अजून लागलेला नाही. मात्र तिकीट वाटपाची वाट न पाहता त्या सातही इच्छुक उमेदवारांनी एकत्रितपणे प्रचाराला सुरवात केलीय.
राजकीय कार्यकर्त्यांसाठी निवडणुका या महत्वाच्या असतात. निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची राजकीय कारकिर्द घडत असते. त्यामुळं तिकीटवाटपानंतर जर उमेदवारी मिळाली नाही तर अनेकदा कार्यकर्ते बंडखोरी करून मैदानात उतरत असतात. मात्र नाशिकच्या इंदिरानगर भागातलं चित्र जरा हटके आहे.
या प्रभागात महिलांसाठी राखीव असलेल्या जागेसाठी मनसेच्या सात महिला कार्यकर्त्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तिकीटवाटपापर्यंतचा वेळ वाया घालणं त्यांना पटत नसावं. त्यामुळे त्यांनी आतापासूनच घरोघरी जाऊन आपल्या पक्षाला मतदान करण्याचा आग्रह सुरू केलाय.
याच प्रभागातली दुसरी जागा अनुसूचित जागेसाठी आरक्षित आहे. त्या जागेवर इच्छुक असलेल्या पुरूष उमेदवारानंही महिलांच्या बरोबरीनं त्याचा प्रचार सुरू केलाय. या अनोख्या प्रचाराचं नागरिकांना कौतुक वाटतंय.
पालिका निवडणुकांमध्ये लेखी परीक्षांच्या माध्यमातून मनसेनं नवा मार्ग धुंडाळलाय. त्यांचे इच्छूक उमेदवारही नवीन प्रयोग करताना दिसताहेत. तिकीट जाहीर होईपर्यंत हे इच्छुक एकत्र प्रचार करणार आहेतच. मात्र तिकीटवाटपानंतर त्यांच्यातली ही एकी कायम राहणार का, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय.
First Published: Saturday, December 24, 2011, 16:05