Last Updated: Wednesday, January 25, 2012, 13:33
www.24taas.com, राळेगणसिध्दी प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचाराची किड वाढत आहे. हा भ्रष्टाचार पाहून लोकांची सहनशक्ती संपत चालली आहे. त्यामुळे भ्रष्टाचा-यांना थप्पड मारा, असा सल्ला भ्रष्टाचाराविरोधात लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.
लोकशाही व्यवस्थेने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जे मार्ग उपलब्ध केले आहेत त्यांच्याद्वारे केलेले प्रयत्न अपुरे पडत आहेत. अशा परिस्थितीत निराश झालेल्या व्यक्तीसाठी भ्रष्टाचा-यांना थप्पड मारुन आपल्या भावना व्यक्त करणे हाच एक मार्ग शिल्लक राहिला आहे. प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार वाढत आहे. लोकांची सहनशक्ती संपत आहे. त्यामुळे थप्पड मारण्यासारख्या हिंसक घटना घटना घडत आहे. पण नागरिकांचाच नाईलाज आहे, असे अण्णा म्हणाले.
भ्रष्टाचाराचा विषय घेऊन तयार केलेल्या ‘ गली गली चोर है ’ या हिंदी सिनेमाचा एक खेळ अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत राळेगणसिद्धी येथे झाला. या प्रसंगी बोलताना, अण्णांनी नाईलाजातून हिंसा होत असल्याचे म्हटले आहे. याआधी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना थप्पड मारण्याची घटना घडल्यानंतर अण्णांनी ‘ बस एक ही थप्पड मारा ’ असे वक्तव्य केले होते. अण्णांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाराज झाला होता. त्यावेळी बोलताना अण्णांनी, थप्पड प्रकरणावरुन बोललो तर ती हिंसा आणि मावळ प्रांतात पोलीस शेतक-यांवर गोळीबार करतात ती अहिंसा आहे का ? , असा प्रश्न उपस्थित केला होता.
First Published: Wednesday, January 25, 2012, 13:33